आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील नवीन विकास बँक म्हणून स्थापित ‘ब्रिक्स बँक’ स्थानिक चलनात आगामी एप्रिलपासून सदस्य देशांना प्रामुख्याने कर्ज सुविधा उपलब्ध करून देईल, असे बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत यांनी येथे सांगितले.
ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या सदस्य देशांच्या भागीदारीने स्थापित ब्रिक्स बँकेत इतर देशांना सदस्यत्व देण्याचा निर्णय येत्या काही महिन्यात बँकेच्या संचालक मंडळाकडून घेतला जाईल, असे कामत यांनी स्पष्ट केले. कर्ज प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होईल. बँकेचे भांडवल १०० अब्ज डॉलर्स असून त्यात भारताचे १८ अब्ज डॉलरचे योगदान आहे.
ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने येथे आले असताना त्यांनी सदस्य देशांच्या नेत्यांशी चर्चेत भाग घेतला. विकासात्मक सहकार्यासाठी कर्जपुरवठा केला जाईल असे त्यांनी सांगितले. कामत हे ब्रिक्स बँकेचे पाच वर्ष अध्यक्ष राहणार आहेत. गेल्या वर्षी ब्रिक्स बँकेचा प्रस्ताव मांडण्यात आला व या बँकेचे पहिले अध्यक्षपद भारताला देण्यात आले आहे. इतर देशांचा कर्जासाठी विचार केला जाईल का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, प्रामुख्याने सदस्य देशांनाच कर्ज दिले जाईल. पही बँक ग्रीसला मदत करील का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, सदस्य नसलेल्या देशांना मदत करण्याचे अधिकार आपल्याला नाहीत, असे असले तरी कालांतराने संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून व्यापकता वाढवली जाईल, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक शांघायमधील मुख्यालयात या महिन्याच्या अखेरीस होत आहे. ब्रिक्स देशांना स्थानिक चलनात कर्ज दिल्याने त्यांचे चलनाच्या किमतीतील चढउतारांपासून संरक्षण होईल.