सेन्सेक्सचार महिन्यांच्या उच्चांकावर

बुधवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या सत्रातील व्यवहाराद्वारे कौतुक केले. गुरुवारच्या एकाच सत्रातील ८४.९७ अंश वाढीने सेन्सेक्स २८,२२६.६१ या गेल्या चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर विराजमान झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १७.८५ अंश भर पडून प्रमुख निर्देशांक ८,७३४.२५ वर पोहोचला.

बुधवारी प्रत्यक्षात अर्थसंकल्प सादर होताना स्थिर असलेला मुंबई निर्देशांक बुधवारी सत्रातील व्यवहारअखेरीस तब्बल ४८६ अंशांनी उंचावला होता. सेन्सेक्सची ही तेजी गुरुवारीही कायम राहिली. आशियाई बाजारातील घसरणीमुळे काहीशी नरम सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्सने सत्रात २८,०७०.८१ हा किमान स्तरही नोंदविला.

दुपारनंतर मुंबई निर्देशांकात पुन्हा एकदा वाढ नोंदली जाऊ लागली. या वेळी सेन्सेक्स २८,२९९.९२ या व्यवहारातील सर्वोच्च टप्प्यावर होता. गुरुवारच्या वरच्या स्तरावरील बंद टप्प्यामुळे सेन्सेक्स आता ४ ऑक्टोबर रोजीच्या २८,३३४.५५ नजीक पोहोचला आहे.

मुंबई शेअर बाजारात अर्थसंकल्पदिनी दबाव असलेल्या आरोग्यनिगा व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना गुरुवारी मात्र मागणी नोंदली गेली. वाहन, भांडवली वस्तू, पायाभूत सेवा वगळता इतर क्षेत्रीय निर्देशांकातही वाढ झाली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्र यांचे मूल्य गुरुवारी २.८५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर डॉ. रेड्डीज्, सन फार्मा आदी औषधनिर्माण क्षेत्रातील समभाग ३.३१ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविणारे ठरले.

सेन्सेक्समधील निम्मे समभाग तेजी तर तेवढेच घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांकांनी एक टक्क्यांपर्यंत वाढ राखली.

लाभार्थी समभाग

अर्थसंकल्पातील तरतुदींचा परिणाम म्हणून भांडवली बाजारात अनेक कंपन्यांच्या समभागांचे मूल्य गुरुवारच्या व्यवहारात लक्षणीय वाढ आढळून आली. यामध्ये प्रामुख्याने बँक, सिगारेट व तंबाखू निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण, पायाभूत सेवा क्षेत्रातील कंपन्या यांचा समावेश राहिला.  अर्थसंकल्पात सिगारेट, पान मसाला व अन्य तंबाखूजन्य पदार्थावरील उत्पादन शुल्क दुप्पट करण्यात आले. तथापि हे प्रमाण जसे अपेक्षिले जात होते त्या तुलनेत वाजवी असल्याने, गोल्डन टोबॅको, गॉडफ्रे फिलिप्स, आयटीसी, व्हीएसटी आदींचे समभाग ५ टक्क्यांपर्यंत वाढले. बँकांचे समभाग मूल्य गुरुवारच्या व्यवहारात ४ टक्क्यांपर्यंत उंचावले.