11 December 2017

News Flash

भांडवली बाजारात गुंतवणूकदारांची नफेखोरी

सेन्सेक्ससह निफ्टीत घसरण; प्रमुख निर्देशांक पूर्वपदावर

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: March 21, 2017 1:12 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सेन्सेक्ससह निफ्टीत घसरण; प्रमुख निर्देशांक पूर्वपदावर

आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या प्रमुख निर्देशांकांचा लाभ पदरात पाडून घेण्याच्या गुंतवणूकदारांच्या नफेखोरी धोरणाने भांडवली बाजाराची सोमवारअखेर मात्र घसरणीत नोंदली गेली. दोन्ही निर्देशांक आता शुक्रवारच्या वरच्या टप्प्यापूर्वीच्या स्थानावर विसावले आहेत.

सत्राच्या शेवटी १३०.२५ अंश घसरणीसह सेन्सेक्स २९,५१८.७४ वर स्थिरावला. तर निफ्टी शुक्रवारच्या तुलनेत ३३.२० अंश घसरणीने ९,१२६.८५ वर थांबला. व्यवहारात मुंबई निर्देशांकाने २९,६९९.४८ पर्यंत झेप घेतली होती. तर निफ्टीचा सत्रातील ९,२१८.४० हा टप्पा ऐतिहासिक ठरला होता.

गेल्या सप्ताहाची अखेर मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने वरच्या टप्प्यावर कायम राहण्यासह केली होती. सोमवारची सुरुवात मात्र घसरणीनेच झाली. दुपारच्या व्यवहारात मात्र निर्देशांकांमध्ये तेजी अनुभवली गेली. परिणामी सेन्सेक्स २९,६९९.४८ तर निफ्टी ९,२१८.४० पर्यंत झेपावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा टप्पा तर विक्रमी ठरला. मात्र दिवसअखेर पुन्हा दबाव निर्माण होत प्रमुख निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत घसरण नोंदविणारे ठरले.

गेल्या आठवडय़ात सेन्सेक्समध्ये तब्बल ७०२.७६ अंश वाढ झाली होती. यावेळी मुंबई निर्देशांक त्याच्या गेल्या दोन वर्षांच्या वरच्या टप्प्यावर होता. तर सप्ताहात २२५.५० अंश वाढ नोंदविणाऱ्या निफ्टीने ९,१६०.०५ असा विक्रमी स्तर आठवडाअखेर राखला होता.

केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू व सेवा कर विधेयकाला सोमवारी मंजुरी दिल्याची दखल बाजाराने घेतली नाही. हे विधेयक आता संसदेत मंजुरीसाठी येईल. त्यानंतर १ जुलै २०१७ पासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.

डॉलरच्या तुलनेत कमकुवत रुपयाची धास्तू माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी सोमवारी भांडवली बाजारात घेतली. परिणामी त्यांचे मूल्यही रोडावले. तर आयडिया-व्होडाफोन विलिनीकरणामुळे एकूणच सूचिबद्ध दूरसंचार कंपन्यांचे समभाग मात्र वाढले. वाहन गटातील समभागही घसरणीच्या यादीत राहिले.

सेन्सेक्समधील ३० समभागांमध्ये अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, रिलायन्स, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, पॉवर ग्रिड, मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र यांचे मूल्य घसरले.

मुंबई निर्देशांकांमध्ये मागणी नोंदविणाऱ्या समभागांमध्ये एनटीपीसी, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, ल्युपिन, ओएनजीसी, गेल, एशियन पेंट्स अशा १४ समभागांचा क्रम राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान सर्वाधिक १.३६ टक्क्य़ांसह घसरला. तर तेल व वायू, बँक आदीही घसरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये मात्र ०.३० टक्क्य़ांपर्यंत वाढ नोंदली गेली.

First Published on March 21, 2017 1:12 am

Web Title: bse nse nifty sensex 20