कोविड-१९ प्रतिबंधक लशीच्या अत्यावश्यक वापर परवानगीनंतर आठवडय़ाभरात प्रत्यक्ष मात्रा वितरणाच्या आशेने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांमधील उत्साह मंगळवारी आणखी वाढला. गेल्या काही सत्रांतील सलग तेजीची परंपरा कायम ठेवताना बाजाराचे प्रमुख निर्देशांक विक्रमाच्या नव्या टप्प्यावर पुन्हा स्वार झाले.

मंगळवारी सेन्सेक्स व्यवहारात २६०.९८ अंश झेप घेत ४८,५०० नजीक ४८,४३७.७८ वर पोहोचला. तर निफ्टी ६६.६० अंश उसळी घेत १४,२०० नजीक, १४,१९९.५० पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांक सप्ताहारंभ तुलनेत अध्र्या टक्क्य़ाहून अधिक वाढले. मंगळवारच्या दिवसभराच्या तेजीच्या वातावरणात मुंबई निर्देशांक ४८,४८६.२४ तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १४,२१५.६० ला स्पर्श करता झाला होता.

सलग दहाव्या सत्रात मुंबई निर्देशांकाने तेजी नोंदविली आहे. या दरम्यान सेन्सेक्समध्ये २,८८३.८२ अंश भर पडली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ६.३३ हून अधिक आहे. डिसेंबर २०२० पासून सेन्सेक्स ४,००० हून अधिक अंशांनी वाढला आहे. मंगळवारच्या विक्रमाला बँक तसेच वित्त क्षेत्रातील समभागांच्या खरेदीचे बळ मिळाले.

चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत कर्ज वितरणातील २६ टक्के वाढीमुळे भांडवली बाजारात सूचिबद्ध एचडीएफसी लिमिटेड या आघाडीच्या खासगी गृह वित्त कंपनीच्या समभागाने मंगवारी त्याचा वार्षिक मूल्य उंच्चांक नोंदवला.

बाजाराचे भांडवलही विक्रमी टप्प्यावर

देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजाराचे बाजार भांडवलही मंगळवारच्या विक्रमी निर्देशांकांमुळे ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मंगळवार व्यवहारअखेर १९२.८७ लाख कोटी रुपये झाले. एकाच व्यवहारात त्यात १४.०८ लाख कोटी रुपयांची भर पडली. सर्वाधिक बाजार भांडवलाबाबत रिलायन्स इंडस्ट्रीज १२.४६ लाख कोटी रुपयांसह क्रमांक एकवर राहिली. तर ११.६० लाख कोटी रुपयांसह टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.