अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्र्हच्या मध्यरात्री उशिराने समारोप होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीतील चर्चाविमर्शातून नेमके काय पुढे येईल, याबद्दल साशंकतेने उलाढाल कमालीच्या मंदावलेल्या भांडवली बाजारात, शेवटच्या काही मिनिटात झालेल्या खरेदीने मुख्य निर्देशांक- सेन्सेक्सला अवधी २२ अंशांची कमाई बुधवारी करता आली. दिवसाच्या मध्यापर्यंत मात्र तो कालच्या तुलनेत १०३ अंश घसरला होता.
फेडच्या निर्णयाबाबत कमालीची अनिश्चितता आणि भारतीय चलन रुपयातील घसरणसदृश चंचलता या दोन्ही घटकांचे बाजारावर आज प्रचंड सावट दिसून आले. फेडचा निर्णय बाहेर येईपर्यंत कुंपणावर बसून वाट पाहण्याचा गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्याने बाजारात फारशी उलाढाल होताना दिसली नाही. परिणामी सेन्सेक्स अवघ्या १३० अंशांच्या चिंचोळ्या पातळीत हेलकावे घेताना दिसला. बँकिंग परवाना मिळवू इच्छिणाऱ्या वित्तीय संस्थांचे समभाग तसेच त्याचप्रमाणे रोमिंग सेवा पूर्णपणे मोफत न करण्याच्या ‘ट्राय’ने दिलेल्या संकेतामुळे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची खरेदी मात्र होताना दिसली. त्याचप्रमाणे मिड कॅप आणि स्मॉल कॅप श्रेणीतील चांगल्या समभागांनी आजच्या वातावरणात सरशी घेतलेली दिसून आले.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्र्हने तेथील अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी मासिक ८५ अब्ज डॉलरच्या रोखे खरेदीचा कार्यक्रम आणखी काही काळ सुरू ठेवेल की नाही, याबद्दल दोन दिवस सुरू राहणाऱ्या बैठकीतून अंतिम निर्णय काय लागेल, या साशंकतेने भारतासह सर्वच आशियाई बाजारांना मंगळवारी घेरल्याचे दिसून आले. जपान, ऑस्ट्रेलियावगळता आशियाई-पॅसिफिक क्षेत्रातील सर्व भांडवली बाजारात कमी-अधिक घसरण दिसून आली.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत देणारे विविधांगी ताजे आकडे पाहता, फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी ‘क्वांटिटेटिव्ह इझिंग (क्यूई)’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोखे खरेदीच्या कार्यक्रमाची धार हळूहळू कमी करण्याबाबत मे महिन्यात सूचित केले होते.
मेच्या प्रारंभी केल्या गेलेल्या या विधानानंतर, अमेरिकी चलन डॉलर हा अन्य सर्व देशांच्या चलनांच्या तुलनेत सशक्त बनत गेल्याचे दिसून आले आहे.
या पाश्र्वभूमीवर दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीची जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये खासच उत्सुकता आहे. ‘क्यूई’ कार्यक्रमात शिथिलता अथवा माघारीचा निर्णय झाल्यास, आशियाई तसेच उदयोन्मुख बाजारांमध्ये गुंतलेल्या डॉलरला पुन्हा मायदेशाकडे पाय फुटतील आणि परिणामी गुंतवणूक आटलेले हे बाजार मंदीच्या खाईत लोटले जातील, अशी भीती विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
निक्केई (जपान) १३,२४५.२२ (१.८३%), एएसएक्स २०० (ऑस्ट्रेलिया) ४८६१.४० (१%) या दोन निर्देशांकामध्ये तेथील स्थानिक कारणांनी वाढ दिसून आली, अन्यथा शांघाई इंडेक्स (चीन) २,१४३.४५ (-०.७३%), हँगसेंग (हाँगकाँग)    २०,९८६.८९ (-१.१३%) त्याचबरोबरीने कॉस्पी (द. कोरिया, – ०.७%) या प्रमुख आशियाई बाजारांनी नांगी टाकली.
रुपया मात्र सावरला!
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी घसरणीला विराम देत, निर्यातदारांकडून खुल्या झालेल्या डॉलरच्या ओघाने बुधवारी रुपया काहीसा भक्कम बनला. ७ पैशांनी उंचावत रुपयाने गेल्या दोन दिवसातील घसरणीतून  प्रति डॉलर ५९ तळापासून डोके वर काढले. चलन व्यवहारातील गेल्या दोन दिवसांच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत १२६ पैशांनी खालावला. मंगळवारी तर स्थानिक चलनाने ५९ नजीक जाताना ९१ पैशांच्या आपटीने ५८.७८ पर्यंत आपटी खाल्ली होती. ५८.७४ या सुधारणेसह चलनाने बुधवारच्या सत्राची चांगली सुरुवात केली होती. दिवसअखेरही चलन ७ पैशांनी भक्कम होत ५८.७० वर विसावले.