मागच्या काही दिवसांपासून सातत्याने उसळी घेत असलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची सध्या पडझड सुरु आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजार अंकांनी कोसळला. २.०८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २९१ अंकांनी घसरुन १४ हजारच्या खाली गेला. सर्वच क्षेत्रातील समभागांवरील विक्रीचा मारा वाढल्याने निर्देशांकात घसरण झाली.

मंगळवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने शेअर बाजार बंद होता. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत १८९१ रुपयापर्यंत पोहोचली होती. एका महिन्यातील हा सर्वात कमी दर आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा घसरण झाली. ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी अ‍ॅमेझॉनकडून फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवहारात कायदेशीरमार्गाने अडथळा आणला जातोय. त्याचा परिणाम रिलायन्सच्या शेअर्सवर दिसून आला.

सिंगापूर लवादाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. मागच्या आठवडय़ात गुरुवारच्या व्यवहारात ‘सेन्सेक्स’ने ५० हजारांच्या ऐतिहासिक आणि भावनिकदृष्टयाही लक्षणीय पातळीला स्पर्श केला होता. सोमवारच्या भयंकर अस्थिर व्यवहारात ‘सेन्सेक्स’ ५३०.९५ अंशांनी गडगडून ४८,३४७.५९ वर स्थिरावला होता.