सार्वजनिक क्षेत्रातील एक जुनी राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या कॅनरा बँकेने विद्यमान २०१४-१५ आर्थिक वर्षांअखेर ८.५० लाख कोटी रुपयांचे एकूण व्यवसायाच्या दृष्टीने लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षी ९,००० अधिकारी व लिपिकांना सेवेत सामावून घेणाऱ्या या बँकेने चालू वर्षांत देशस्तरावर आणखी आठ हजाराच्या भरतीची योजना असल्याचे म्हटले आहे.
बाजारस्थितीतील सकारात्मक बदल आणि संभाव्य आर्थिक वृद्धी पाहता, २०१४-१५ आर्थिक वर्षांत बँकेच्या ठेवींमध्ये १६ ते १७ टक्के दराने तर कर्ज वितरणात १९-२० टक्क्य़ांची वाढ दिसून शकेल, असे कॅनरा बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. के. दुबे यांनी ‘लोकसत्ता’कडे बोलताना विश्वास व्यक्त केला. सरलेल्या २०१३-१४ आर्थिक वर्षांत बँकेने ४.२ लाख कोटींच्या ठेवी आणि ३ लाख कोटींचे कर्ज वितरण असे मिळून रु. ७.२२ लाख कोटींचा एकूण व्यवसाय केला. जो आधीच्या वर्षांच्या तुलनेत २०.७ टक्क्य़ांनी वाढला आहे. तथापि मार्च २०१५ पर्यंत याच वृद्धीदरासह ८.५० लाख कोटी रुपयांचे व्यवसायाचे लक्ष्य गाठता येईल, असे दुबे यांनी सांगितले.
व्यवसाय वाढीच्या दृष्टीने आखलेले नियोजन स्पष्ट करताना दुबे यांनी सांगितले की, चालू वर्षांत १,२५० नवीन शाखा उघडून एकूण शाखांची संख्या ६,००० वर नेली जाईल, तर एटीएमची संख्या सध्याच्या ६,३१२ वरून १०,००० वर नेण्याचे लक्ष्य आहे. आगामी काळ हा वेगवान वृद्धीचा राहील असे स्पष्ट करताना, चालू वर्षांत १ कोटी नवीन ग्राहकांना बँकेच्या सेवा जाळ्यात आणून सध्याच्या ५.५ कोटी ग्राहकांमध्ये भर घातली जाईल.
भांडवल पर्याप्ततेसाठी केंद्र सरकारने फेब्रुवारीतील हंगामी अर्थसंकल्पात सरकारी बँकांसाठी मंजूर केलेल्या ११,३०० कोटी कॅनरा बँकेलाही हिस्सा अपेक्षित आहे, असे दुबे यांनी सांगितले. मागील वर्षी केंद्र सरकारकडून ५०० कोटींचे भांडवली स्फुरण बँकेला मिळाले आणि बँकेने बॅसल ३ बाँड्सची विक्री करून २,५०० कोटी रुपये उभारून भांडवलात भर घातली. चालू वर्षांतही ३,००० कोटी रुपये भांडवली पर्याप्ततेसाठी उभे करण्याचा बँकेचा मानस असल्याचे दुबे यांनी सांगितले.
यासाठी पात्र संस्थागत गुंतवणूकदार (क्यूआयपी), हक्कभाग विक्री, प्राधान्याने समभाग विक्री किंवा बदलेल्या बाजारस्थिती खुली भागविक्री (आयपीओ) अशा विविधांगी पर्यायांवर विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विक्रमी ५,००० कोटींची कर्जवसुली
थकीत अर्थात अनुत्पादित कर्ज मालमत्तेची (एनपीए) समस्येने कॅनरा बँकही ग्रस्त असली तरी बँकेची थकीत कर्जाची वसुलीची कामगिरीही उत्साहदायी असल्याचे दुबे यांनी सांगितले. २०१२-१३ मध्ये बँकेने रु. ४,००६ कोटींची थकीत कर्जे, तर सरलेल्या २०१३-१४ मध्ये तब्बल ५,००० कोटींची वसुली केली गेली. दैनंदिन निगराणी व देखरेख, खास वसुली शाखांचे कार्यान्वयन, केवळ वसुलीसाठी तीन महाव्यवस्थापक आणि दोन महाव्यवस्थापक पतविषयक देखरेखीसाठी बँकेने नियुक्त केले असल्याची त्यांनी माहिती दिली.