मुंबई : खासगी क्षेत्रातील अग्रणी आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी चंदा कोचर यांच्या निवृत्तीचा अर्ज ताबडतोब स्वीकारत, त्यांना बँकेच्या सर्व उपकंपन्यांवरूनही पदमुक्त करीत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. ५७ वर्षीय चंदा कोचर यांच्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा अशा तऱ्हेने अकाली अस्त झाला.

चंदा कोचर यांच्या विरोधात असलेल्या आरोपांबाबत चौकशीचा ससेमिरा मात्र कायम राहणार आहे व्हिडीओकॉन समूहाला कर्ज मंजूर करणाऱ्या समितीवर त्या होत्या आणि कर्जमंजुरी करताना त्यांनी बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वेणुगोपाल धूत हे या मंजूर कर्जाचे लाभार्थी हे कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे न्यू पॉवर या ऊर्जा कंपनीतील व्यावसायिक भागीदार असल्याचे नंतर पुढे आले. त्यातून कोचर यांनी कर्जमंजुरीतून पतीचेच हितसंबंध जपल्याचे आरोपांच्या गदारोळात बँकेच्या संचालक मंडळाने चौकशी पूर्ण होईपर्यंत कोचर यांना अनिश्चित काळासाठी रजेवर जाण्यास सांगितले. अखेर कोचर यांनी बँकेतून पदमुक्त होण्याची परिणती गाठणाऱ्या घटनाक्रमाचा मागोवा..

’ २८ मार्च २०१८ : आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष एम. के. शर्मा यांनी व्हिडीओकॉन समूहाला ३,२५० कोटींचे कर्ज मंजूर करणाऱ्या पत-समितीत चंदा कोचर सहभागी असल्याची कबुली दिली.

’ ३१ मार्च २०१८ : ‘सीबीआय’च्या प्राथमिक चौकशीत दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्यात आर्थिक संबंध असल्याचे निष्पन्न.

’ २ एप्रिल २०१८ : कोचर यांचे दीर राजीव कोचर (अविस्ता अ‍ॅडव्हायजर, सिंगापूर) हेही व्हिडीओकॉन समूहाच्या कर्जखात्यांच्या पुनर्रचनेत सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न

’ ५ एप्रिल २०१८ : राजीव कोचर यांना सीबीआयने मुंबई विमानतळावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले.

’ १५ एप्रिल २०१८ : केंद्र सरकारने हस्तक्षेप करीत कंपनी व्यवहार विभागाकडून तपशील मागविला.

’ ४ मे २०१८ : दीपक कोचर यांना तपासयंत्रणेकडून चौकशी, प्राप्तिकर विभागाकडूनही समन्स.

’ ३० मे २०१८ : बँकेच्या संचालक मंडळाकडून न्या. श्रीकृष्ण यांच्याद्वारे अंतर्गत चौकशीची घोषणा

’ ३१ मे २०१८ : चंदा कोचर रजेवर गेल्याने गोंधळ. पुढे अफवा शमविण्यासाठी प्रत्यक्षात त्या वार्षिक सुट्टीवर असल्याचा खुलासा.

’ १८ जून २०१८ : चौकशी सुरू असेपर्यंत कोचर रजेवर असतील, पण त्यांचे पद कायम ठेवत असल्याची संचालक मंडळाची घोषणा. संदीप बक्षी यांच्याकडे हंगामी कार्यभार

’ ७ सप्टेंबर २०१८: भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून चंदा कोचर आणि आयसीआयसीआय बँकेच्या नियम उल्लंघनाची चौकशीचा निर्णय

’ १२ सप्टेंबर २०१८ : आयसीआयसीआय बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, भागधारकांच्या चंदा कोचर-व्हिडीओकॉन प्रकरणी प्रश्नांना वाटाण्याच्या अक्षता