पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवार रात्रीच्या २० लाख कोटी रुपयांच्या अर्थसहाय्य घोषणेनंतर प्रत्यक्षात कुणाला आणि काय मिळणार या उत्सुकतेपोटी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात बुधवारी दिवसभर समभाग खरेदीसाठी पसंती दर्शविली.

परिणामी गेल्या अनेक सत्रानंतर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सला बुधवारी ३२ हजाराचा टप्पा गाठता आला. व्यवहारात, मंगळवारच्या तुलनेत १,४७४.३६ अंशपर्यंत उसळी घेणारा मुंबई निर्देशांक सत्रअखेर ६३७.४९ अंश वाढीने ३२,००८.६१ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक दिवसअखेर १८७ अंश वाढीसह ९,३८३.५५ पर्यंत स्थिरावला.

प्रामुख्याने देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्राला घसघशीत अर्थसहाय्य जाहीर होण्यापूर्वी भांडवली बाजारात बुधवारच्या सुरुवातीच्या सत्रापासूनच निर्देशांक तेजी नोंदली जात होती. ती अखेपर्यंत कायम राहिली.

मूल्य वाढीच्या समभागांमध्ये विशेष करून बँक, वित्त क्षेत्रातील समभाग राहिले. घसरणीत केवळ चारच कंपनी समभाग राहिले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक जवळपास प्रत्येकी २ टक्क्य़ांपर्यंत वाढले.