मुंबई : औषध विक्रेता आणि वितरकांची संघटना – ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट (एआयओसीडी) या देशाच्या औषधाच्या ऑनलाइन विक्रीच्या अर्थात ई-फार्मसीच्या धोरणाला विरोध करीत, येत्या २८ सप्टेंबरला एक दिवसाचा बंद पुकारत असल्याची घोषणा केली आहे.

कें द्र सरकारने ई-फार्मसीना भारतात कार्य करण्याची मुभा दिल्याने, औषध विक्रेत्यांचे व्यावसायिक नुकसान होणार आहेच, त्यापेक्षा ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ न कधीच भरून न येणारे नुकसान होऊ  शकते, याकडे विविध निवेदनांद्वारे लक्ष वेधण्यात आले. इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीच्या विरोधात खटले दाखल केले गेले आणि या समस्येच्या गांभीर्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन वेळा एक दिवसाकरिता भारतातील सर्व औषध दुकाने बंद करण्यासोबतच आठ तास काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी सरकार दाखवीत दिसत असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून हे संपाचे हत्यार उपसावे लागत असल्याचे ‘एआयओसीडी’चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी सांगितले.

औषधांचे सत्यापन केल्याशिवाय मागणी नोंदविणे, डॉक्टरांच्या सल्ल्याविना विक्रीला प्रतिबंध असलेल्या औषधांची सहज उपलब्धता, जुन्या किंवा बनावट प्रीस्क्रिप्शन्सद्वारे औषधांची विक्री त्याचप्रमाणे या कंपन्या औषध कायद्याच्या कलम १८(क)च्या तरतुदींचे उल्लंघन करीत, सर्रास वैध परवान्याशिवाय माध्यमातून औषधांच्या जाहिरात करतात, असे ई-फार्मसीबाबत आक्षेप संघटनेच्या सदस्यांनी सोदाहरण नोंदविले आहे. त्या बाबत प्रशासनाने दाखविलेल्या निष्क्रियतेने सर्व औषध विक्रेत्यांच्या मनात अस्वस्थेची भावना असल्याचे शिंदे यांनी सांगितले.