गोदाम प्रकल्पांचे केंद्र असलेल्या पनवेल परिसरात दररोज हजारो अवजड वाहनांची रेलचेल असलेल्या ठिकाणी आता ट्रक चालकांसाठी आरोग्य तपासणी व वैद्यक उपचाराचीही सोय होईल. श्रीराम समूहाचे सामाजिक कार्याचे अंग असलेल्या श्रीराम फाऊंडेशनच्या फिरत्या चिकित्सालयांनी ही सुविधा दिली आहे. देशभरात अशी १०० चिकित्सालये आणि संलग्न मोबाइल व्हॅन्स सुरू करण्याचा श्रीराम समूहाचा संकल्प आहे.

पनवेल-नवी मुंबई परिसरातील ट्रकचालक कुटुंबांची मोठी लोकवस्ती लक्षात घेऊन कळंबोली येथे प्रयोग सुरू झालेले चिकित्सालय व मोबाइल क्लिनिक व्हॅनला मिळालेला प्रतिसाद खूपच उत्साहदायी आहे, असे श्रीराम ट्रान्सपोर्ट्स फायनान्स कॉर्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पुणतांबेकर यांनी सांगितले. श्रीराम समूहातील सर्व कंपन्यांचे सामाजिक दायित्वापोटी विविध उपक्रम हे श्रीराम फाऊंडेशनद्वारेच पार पडले जातात. देशातील ट्रकचालकांना अर्थसाहाय्य देणारी सर्वात मोठी कंपनी या नात्याने श्रीराम फाऊंडेशनने याच ग्राहक समूहाला उद्देशून अनेक उपक्रम सुरू केले आहेत, त्यापैकी स्थायी वैद्यक निगेच्या या उपक्रमाचे अनेक गुणात्मक परिणाम दिसून येत असल्याचे पुणतांबेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे कळंबोलीपाठोपाठ देशाच्या अनेक भागांत महिन्याकाठी एक अशी चिकित्सालयांची शृंखला रुंदावत चालली आहे. लवकरच ही संख्या १०० वर नेण्याचे फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक चिकित्सालयात एक अनुभवी डॉक्टर, मदतनीस आणि निदान उपकरणे व प्राथमिक औषधांचा साठा असलेली एक व्हॅन अशी सोय केली जाणार आहे.
ट्रकचालक व त्यांच्या कुटुंबीयांना या चिकित्सालयातून आरोग्यनिगेसह एक अद्वितीय ओळख क्रमांक दिला जाईल, ज्या अंतर्गत त्यांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास, उपचार व औषधांच्या नोंदी या ऑनलाइन उपलब्ध असतील. त्यामुळे ट्रकचालक देशाच्या कोणत्याही भागात स्थलांतरित झाला तर त्याच्या व कुटुंबाच्या वैद्यक-निगेत हयगय होण्याचा संभव नसल्याचे पुणतांबेकर यांनी या वाहतूकदार संघटनेसह संयुक्तपणे सुरू असलेल्या उपक्रमाबाबत बोलताना सांगितले.
याच धर्तीचा ११ ते १७ वयोगटातील म्हणजे इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा उपक्रमही फाऊंडेशनकडून सुरू आहे.अलीकडेच बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसह पार पडलेल्या कार्यक्रमातून मुंबईतील २३८ ट्रकचालकांच्या मुलांना प्रत्येकी ३,००० (१० वीपर्यंत) आणि ३,५०० (११ वी, १२वी) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. देशभरात गत दोन वर्षांत १०,००० हजार विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी ठरले असून, पुढील तीन वर्षांत ही संख्या १ लाखांवर नेण्याचे फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे.
सध्या कायद्याच्या सक्तीने कंपन्यांनी सामाजिक दायित्व या नात्याने काही रक्कम दरसाल खर्ची करणे अपेक्षित आहे; पण रकमेच्या अस्सल विनियोगाची काळजी खूपच थोडय़ा कंपन्या घेतात. थोडय़ाथोडक्या रकमेतूनही लक्षणीय सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक बदल साधता येतो. आमच्या उपक्रमांमधून हे दिसून आले आहे. श्रीराम फाऊंडेशनसाठी तर खर्चासाठी उपलब्ध रक्कम यापेक्षा ठरविलेल्या उपक्रमांनी निर्धारित लक्ष्य गाठणे अधिक महत्त्वाचे आहे.
’ प्रवीण पुणतांबेकर,
वरिष्ठ उपाध्यक्ष, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कॉर्पोरेशन