जागतिक अर्थवृद्धीला मात्र फटका

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या उद्रेकाचा भारतावरील परिणाम खूपच मर्यादित राहील, मात्र चीनसारखी महाकाय अर्थव्यवस्था प्रभावित झाल्याने त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येणे अपरिहार्य आहे, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले.

भारतातील काही मोजक्या उद्योग क्षेत्रांमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिणामी उलथापालथ दिसून येईल, पण या समस्येवरही पर्यायी उपाय योजून मात केली जाईल, असे दास यांनी स्पष्ट केले. या आजारसाथीच्या उद्रेकाने चीनसारखी जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था पूर्णपणे थंडावली असून, त्याचा जगाच्या मोठय़ा हिश्शातील उद्योगांवर विपरीत परिणाम मात्र दिसून येतो, असे ते म्हणाले.

भारतातील औषधी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्माता उद्योगाची मदार ही चीनमधून येणाऱ्या सुटय़ा घटकांवर अवलंबून आहे, त्यांना या आजारसाथीचे परिणाम जाणवतील, असे दास यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

भारत असो अन्य कोणताही देश असो प्रत्येक धोरणकर्त्यांने बारकाईने लक्ष ठेवावे असा हा मुद्दा निश्चितच आहे. प्रत्येक धोरणकर्ते, प्रत्येक पतधोरण नियंत्रकांनी सध्याच्या परिस्थितीबाबत दक्ष राहायला हवे. एकुणात करोना विषाणूंचा विषय सावधपणे हाताळला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी २००३ साली ‘सार्स’च्या साथीच्या वेळी चीनची अर्थव्यवस्थेला एक टक्का घसरणीचा फटका बसला आहे. त्या वेळी ती जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि सकल जागतिक उत्पादनात तिचा हिस्सा अवघा ४.२ टक्के होता. त्या उलट आज ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि जागतिक उत्पादनातील तिचा हिस्सा १६.४ टक्के इतका आहे.