मुंबई : बँकेतर वित्तीय कंपन्यांना हादरे देणाऱ्या देणी थकण्याच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये सरलेल्या २०१९ सालात क्रेडिट रिस्क फंडांनी अपकीर्ती मिळविली असली, तरी गेल्या काही महिन्यांमध्ये या फंडातील गुंतवणुकीचा ओघ निरंतर वाढताना दिसत आहे. विशेषत: तीन फंड घराण्यांची या आघाडीवरील कामगिरी सरस ठरली आहे.

वर्षांच्या प्रारंभाच्या तुलनेत क्रेडिट रिस्क फंडांतील गंगाजळी नोव्हेंबर २०१९ अखेर २० टक्क्य़ांनी गडगडून ६३,७५४ कोटी रुपयांवर आली आहे. या स्थितीतही या प्रकारातील आकारमानाने दुसरा मोठा फंड असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रिस्क फंडाची गंगाजळी वर्षभरात ३.०९ टक्क्य़ांनी वाढून ११,७०७ कोटी रुपये झाली आहे. अर्थलाभ डॉट कॉमकडून संकलित आकडेवारीनुसार, वर्षभरात ९.३० टक्क्य़ांच्या परतावा देऊन या निकषावर हा फंड अग्रेसर राहिला आहे. कोटक क्रेडिट रिस्क फंडाची गंगाजळी १.०७ टक्क्य़ांनी वाढली, तर वार्षिक परतावा दर ८.५० टक्के आहे. आयडीएफसी क्रेडिट रिस्क फंडाने या कालावधीत ९.१० टक्के परतावा दिला आहे.

क्रेडिट रिस्क फंड या वर्गवारीत सध्या २० योजना कार्यरत आहेत. एप्रिल २०१९ अखेर ७९,६४३ कोटी रुपये गंगाजळी असलेल्या या फंडांतील गुंतवणुकीला विशेषत: ऑगस्टमधील ‘आयएल अँड एफएस’च्या प्रकरणानंतर घरघर सुरू झाली. डीएसपी, यूटीआय, एल अँड टी आणि निप्पॉन इंडिया या फंड घराण्यांच्या क्रेडिट रिस्क फंडांची गंगाजळीला तर वर्षभरात अनुक्रमे ७२.८८ टक्के, ६८.६५ टक्के, ४७.२८ टक्के आणि ४७.०३ टक्के असा फटका बसला असल्याचे अर्थलाभची आकडेवारी सांगते.