अन्य विमान सेवांचा प्रवासही महागला; मुंबई विमानतळावरील तिकीट खिडक्यांवर गर्दी

मुंबई : जेट एअरवेजने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेवा रद्द केल्याने प्रवाशांची तिकीट परताव्यासाठी धावाधाव सुरू असून मुंबई विमानतळावरील जेटच्या तिकीट खिडक्यांवर परताव्यासाठी एकच गर्दी होऊ लागली आहे. मात्र परतावा मिळण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतील, अशी माहिती कंपनीकडून प्रवाशांना दिली जात आहे. आयत्या वेळी अन्य विमान सेवांची तिकिटे आरक्षित करतानाही प्रवाशांना जादा रक्कम मोजावी लागत असल्याने एकच गोंधळ उडत आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. वेतनमुद्दय़ावरून जेट कर्मचारी व व्यवस्थापनात खडाजंगी सुरू आहे. जेट कंपनीने तर गेल्या काही दिवसांत आपली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यासही सुरुवात केली. लंडन, बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका यासह अन्य सेवा जेटने रद्द केल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. एक ते दोन महिने आधी तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना कंपनीने अचानक मेल व मेसेज पाठवून सेवा रद्द केल्याचे सांगितले. त्यामुळे बाहेरगावी जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना याचा धक्काच बसला आहे. त्यामुळे अन्य विमान कंपन्यांचे त्या मार्गावरील तिकीट आरक्षण केल्यास मोठी रक्कम प्रवाशांना मोजावी लागत आहे.

मुंबईत राहणारे दीपेश पटेल हे पत्नीसह २ मे रोजी अमेरिकेला जाणार होते. त्यासाठी त्यांनी जेट एअरवेजचे तिकीट काढले होते. परंतु १७ एप्रिल रोजी त्यांना सेवा रद्दच झाल्याचा मेल आला. परतावा मिळवण्यासाठी त्यांनी जेट तिकीट खिडक्यांकडे धाव घेतली. पटेल म्हणाले की, मे महिन्यात अमेरिकेला जाण्याचे नियोजन आधीच केले होते. परंतु सेवा रद्द झाल्याचा मेल आल्याने मोठी समस्या उभी राहिली आहे. तिकीट काढले तेव्हा प्रत्येकी ८० हजार रुपये किंमत होती. आता अन्य विमान सेवांची त्याच मार्गावरील तिकिटांची किंमत १ लाख ४० हजारापर्यंत पोहोचली आहे. परताव्यासाठी आलो तर पंधरा ते वीस दिवस लागतील, असे कंपनीने स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.

मुलुंडला राहणारे महेंद्र गोलतकर यांनी ३१ मार्च रोजी जेटची दोन तिकिटे काढली होती. अचानक सेवा रद्द झाल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी परतावासाठी जेटच्या अंधेरीतील कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु मुंबई विमानतळावर परतावा मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. गोलतकर म्हणाले की, मी तिकीट काढणाऱ्या अधिकृत एजंटकडून तिकीट काढले होते. परंतु जेटकडून एजंटाना सेवा रद्द झाल्याच्या अधिकृत माहितीचा मेल न पाठवल्याने पैसे जेटच्या तिकीट खिडकीवरूनच मिळतील, असे एजंटने स्पष्ट केले. त्यामुळे परताव्यासाठी धावाधाव करत असल्याचे ते म्हणाले. जेटच्या हेल्पलाइनवरही मदतीसाठी फोन केल्यास त्यांच्याकडून अद्याप विविध योजनांची माहिती ऐकवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.