प्राप्तिकर विभागाने सरलेल्या आर्थिक वर्षांसाठी कर विवरणपत्रे दाखल करण्याच्या मुदतीत आणखी दोन महिन्यांनी वाढ करून ती ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविली आहे.

करोना साथीच्या रोगाच्या थैमानाने करदात्यांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेता, २०१९-२० या कर-निर्धारण वर्षांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२० वरून ३० नोव्हेंबर २०२० करण्यात येत असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका आदेशाद्वारे बुधवारी जाहीर केले.

आर्थिक वर्ष २०१८-१९च्या विलंबित आणि सुधारित विवरणपत्रांनाही ही मुदतवाढ लागू होणार आहे. अशा करदात्यांना उपलब्ध करण्यात आलेली ही चौथी मुदतवाढ आहे. सर्वात प्रथम मार्चमध्ये विवरणपत्रे दाखल करण्याला ३१ मार्च ते ३० जून अशी मुदतवाढ दिली गेली. नंतर जूनमध्ये ही मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. जुलैमध्ये पुन्हा ती ३० सप्टेंबर अशी निर्धारित करण्यात आली आणि आता त्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठरविण्यात आली आहे. विवरणपत्र दाखल करण्यासाठी दिल्या जात असलेल्या अतिरिक्त कालावधीमुळे, अधिकाधिक करदात्यांनी करविषयक अनुपालन करून विवरणपत्रातून त्याची पूर्तता करावी असा आहे.

नवी दिल्ली : मागील सहा महिन्यांत, २९ सप्टेंबपर्यंत प्राप्तिकर विभागाने ३३ लाखांहून करदात्यांना १.१८ लाख कोटी रुपयांचा कर-परतावा (रिफंड) दिला आहे. बुधवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ट्वीट करून ही माहिती दिली. यामध्ये ३१.७५ लाख वैयक्तिक प्राप्तिकर भरणाऱ्यांना ३२,२३० कोटी रुपयांची रक्कम परतावा स्वरूपात मिळाली आहे. तर १.७८ लाख कंपनी करदात्यांना ८६,०९४ कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.