निर्देशांक १७ महिन्यांत प्रथमच  ५.२१ टक्क्य़ांवर

अन्नधान्य तसेच इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे २०१७ अखेर महागाई दर जवळपास दीड वर्षांच्या वरच्या स्तरावर गेला आहे. किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर गेल्या महिन्यात ५.२१ टक्के असा १७ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. परिणामी, रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा आता मावळली आहे.

किरकोळ महागाई निर्देशांकावर आधारित महागाई दर यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये ३.४१ टक्के होता. तर नोव्हेंबर २०१७ मध्ये तो ४.८८ टक्के होता.

अन्नधान्याच्या किमती यंदाच्या डिसेंबरमध्ये ४.९६ टक्क्यांपर्यंत भडकल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये या जिनसांचे दर ४.४२ टक्के होते. अन्नधान्याचे दर सप्टेंबरमध्ये घसरले होते, मात्र पुन्हा पुढील महिन्यात ते वाढले. तर इंधन महागाई जुलैपासून सातत्याने वाढत आहे.

डिसेंबरमध्ये भाज्यांचे दर डिसेंबरमध् ये २९.१३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यापूर्वीच्या महिन्यात ते २२.४८ टक्के होते. तर डाळींच्या दरात २३.४७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यंदा भाज्या, फळे, अंडी आदी वस्तू महाग झाल्या आहेत.

२०१२ पासून सादर करण्यात येत असलेला महागाई निर्देशांक २०१७ मध्ये जूनमध्ये १.४६ टक्के असा किमान होता. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, चालू एकूण वर्षांत तो ६.५ टक्के असण्याचा अंदाज आहे. महागाई दरात भर घालणाऱ्या इंधनाबाबत जागतिक स्तरावर प्रति पिंप ७० डॉलपर्यंत दर गेले आहेत. डिसेंबर २०१४ नंतर प्रथमच त्यात वाढ नोंदली जात आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताणात वाढ

*  यंदाचा महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या ४ टक्के अंदाजापेक्षा खूपच पुढे असल्याने आगामी पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता आता मावळली आहे. मध्यवर्ती बँकेने यापूर्वीही दरात कोणतेही बदल केले नव्हते. आगामी कालावधीत कमी विकास दरासह वाढत्या महागाईचे संकट असेल, असा अंदाज रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केला होता. रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी २०१८-१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणार आहे.