विजय मल्या यांच्या मंगलोर केमिकल्स अ‍ॅन्ड फर्टिलायजर्सवर ताबा मिळविण्याच्या प्रक्रियेत सोमवारी आश्चर्यकारक घडामोड घडली. वर्चस्वासाठी झुआरी समूहाबरोबर कट्टर स्पर्धा निर्माण करणाऱ्या दीपक फर्टिलायजर्सने कंपनीतील २.२ टक्के हिस्सा अचानक कमी केला. कंपनीने मंगलोर केमिकल्समधील आपला हिस्सा २२ कोटी रुपयांना विकला.
दीपक फर्टिलायजर्सने सोमवारी मुंबई शेअर बाजाराला आपण २६ लाख समभाग विकल्याचे कळविले. विविध नऊ व्यवहारांद्वारे ही प्रक्रिया गेल्या महिन्यात पार पडल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. कंपनीने तिच्या एससीएम सॉइलफर्ट लिमिटेडद्वारे हा व्यवहार पार पाडला. मंगलोर केमिकल्समध्ये आता दीपक फर्टिलायजर्सचा हिस्सा ३१.२५ टक्क्यांवरून २९.०५ टक्क्यांवर आला आहे. तर मल्या यांच्या यूबी समूहाचा कंपनीत २१.९७ टक्के हिस्सा आहे. झुआरी समूह १६.४७ टक्के हिस्सा राखून आहे. झुआरीने गेल्याच आठवडय़ात हिस्सा वाढीचा मनोदय व्यक्त केला होता. ४.३३ लाख समभागांद्वारे तो ३६.५६ टक्क्यांवर नेण्याचा कंपनीचा मानस होता. कोलकत्याचे उद्योगपती सरोज पोद्दार यांच्या झुआरी समूहाबरोबर दीपक फर्टिलायजर्सची मंगलोर केमिकल्सवर ताबा मिळविण्याची स्पर्धा सुरू होती.