स्टेट बँकेत दोन अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालकांची नेमणूक लवकरच

देशातील सर्वात मोठय़ा बँकेला अर्थात भारतीय स्टेट बँकेला लवकरच दोन नवीन व्यवस्थापकीय संचालक मिळतील. स्टेट बँकेने सरकारकडे व्यवस्थापकीय संचालकाच्या पदसंख्येत सध्याच्या चार वरून वाढ करून सहा करण्यासाठी परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने या बाबतीत अधिकृत मंजुरी दिली नसली तरी याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
सध्याच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या चार पदांवर प्रदीप कुमार (कॉर्पोरेट बँकिंग), बी. श्रीराम (वैयक्तिक बँकिंग), व्ही जी कन्नन (सहयोगी बँका) व रजनीश कुमार (नियमन व जोखीम) आदी कार्यरत आहेत. यापकी प्रदीपकुमार हे ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी व व्ही जी कन्नन हे जुल २०१६ व स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या ऑक्टोबर २०१६ मध्ये निवृत्त होतील. सेवाज्येष्ठतेनुसार प्रवीण कुमार (सध्या एसबीआय कॅप्सचे व्यवस्थापकीय संचालक), वर्षां पुरंदरे (उप-व्यवस्थापकीय संचालक व मुख्य पत अधिकारी), दिनेश खैरा (सध्या एसबीआय फंड्सचे व्यवस्थापकीय संचालक), सुनील श्रीवास्तव (उपव्यवस्थापकीय संचालक कंपनी सेवा व नवीन व्यवसाय), शशी कुमार (उपव्यवस्थापकीय संचालक लेखा) यांची अनुक्रमे पदोन्नती होणे अपेक्षित आहे.
स्टेट बँकेची स्थापना संसदेने मंजूर केलेल्या स्टेट बँक कायद्यानुसार झाली आहे. विद्यमान कायद्यानुसार बँकेत व्यवस्थापकीय संचालकांच्या चार पदांना मान्यता असल्याने असल्याने व्यवस्थापकीय संचालकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करून हे त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजूर मिळणे आवश्यक आहे. कायद्यातील दुरुस्तीच्या या प्रक्रियेसाठी किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने मागील आठवडय़ात स्टेट बँक व आयसीआयसीआय बँक या दोन बँकांना धोरणात्मक महत्त्वाच्या बँका असल्याचे घोषित केले आहे.

एस्सेल युटिलिटीजला ‘आययूकॅन २०१५’ सोहळ्यात सर्वोत्तम कारभार पद्धतीचा पुरस्कार
मुंबई : एस्सेल समूहातील पायाभूत क्षेत्र आणि उपयोजित कार्यासाठी स्थापित कंपनी एस्सेल युटिलिटीज डिस्ट्रिब्युशन कंपनी लि. (ईयूडीसीएल)ने तिसऱ्या ‘आययूकॅन २०१५’च्या शानदार पुरस्कार सोहळ्यात मानाचा पुरस्कार पटकावला. व्यवस्था आणि सेवा प्रदानतेत गुणात्मक सुधार आणणाऱ्या कंपनीच्या व तिच्या भागीदारांनी अनुसरलेल्या सर्वोत्तम कारभार पद्धतीचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कंपनीने औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे राबविलेल्या पेयजल पुरवठय़ाच्या प्रकल्पासाठी ग्राहक सेवेच्या कामगिरीचा नवा मानदंड स्थापित केल्याची पुरस्काराने दखल घेतली आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीज कंपनी लिमिटेडचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराणा, एस्सेल इन्फ्रा अँड युटिलिटीजचे साहाय्यक उपाध्यक्ष (व्यवसाय विकास) राजीव ढोलकिया आणि एस्सेल युटिलिटीजचे उपाध्यक्ष – आयटी सतीश कुलकर्णी यांची या पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती होती.