विशाल उद्योग प्रदर्शने व व्यापार मेळ्यांच्या आयोजनाचा हातखंडा राहिलेल्या दुबईस्थित डीएमजी इव्हेन्ट्स जागतिक विस्तार मोहिमेवर असून, अलीकडेच तिने त्याअंतर्गत भारतात नवीन कार्यालयांद्वारे आपले अस्तित्व विस्तारले आहे. बांधकाम सामग्रीला वाहिलेल्या ‘बिग ५ कन्स्ट्रक्ट इंडिया’ प्रदर्शनाची ही कंपनी फिक्कीच्या बरोबरीने सहआयोजक राहिली आहे. देशात येत्या काळात ताबा व अधिग्रहणाच्या माध्यमातून वेगवान विस्ताराचे कंपनीचे नियोजन आहे.
देशातील सकारात्मक सत्ताबदल आणि या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांना प्रोत्साहनासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांच्या परिणामी अनेक उद्योग क्षेत्रांसाठी चांगल्या संधी निर्माण होणार असून, त्याचाच लाभ घेण्यासाठी या बाजारपेठेत अस्तित्व वाढविण्याचा आपण निर्णय घेतला असल्याचे, डीएमजी इव्हेन्ट्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष माइक आलसोप यांनी सांगितले.
ब्रिटिश माध्यमसमूह डेली मेल अ‍ॅण्ड जनरल ट्रस्टचाच एक अंग असलेल्या डीएमजीने भारतात अलीकडेच स्थावर मालमत्ता क्षेत्रात संशोधन, विश्लेषणात्मक व विपणन कार्य करणाऱ्या प्रोपस्टॅक या पुणेस्थित कंपनीवर १९ कोटी रुपयांच्या मोबदल्यात ताबा मिळविला.
येत्या काळात आपल्या व्यावसायिक स्वारस्याशी साधम्र्य सांगणाऱ्या तत्सम ताबा व अधिग्रहणाच्या संधींचा निरंतर मागोवा घेतला जाईल आणि त्यायोगे भारतीय बाजारपेठेतील स्थान आणखी बळकट केले जाईल, असे आलसोप यांनी सांगितले.
डीएमजी इव्हेन्ट्सचे देशातील प्रभारी म्हणून साजिद देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असून, मुंबईतील मुख्यालयातून ते कामकाज पाहतील. कंपनीने बंगळुरू येथे अलीकडेच नवीन कार्यालय सुरू केले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये नियोजित ‘बिग ५ कन्स्ट्रक्ट इंडिया’ प्रदर्शनाबाबत देश-विदेशातून उत्सुकता व प्रतिसाद हा देशातील बदलत्या राजकीय-आर्थिक वातावरणाचाच परिणाम असल्याचे देसाई यांनी सांगितले.