तंत्रज्ञानाशी मत्री याचा अर्थ  जे काही नवीन बदल आणि  ते देखील ग्राहकाभिमुख व ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन सुविधांच्या बाबतीत घडत आले आहेत, त्याचा स्वत:साठी फायदा करून घेणे इतका सरळ आहे.
‘‘हे इतकं सोपं होतं हे आम्हाला माहीतच नव्हतं.’’ ही प्रतिक्रिया गेल्या आठवडय़ातील स्टेट बँकेच्या ‘ग्रीन चॅनल’विषयी लेखावर अनेक वाचकांनी व्यक्त केली आहे. अन्य बँकांतूनही अशी सेवा उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाशी मत्री याचा अर्थ जे काही नवीन बदल आणि तेदेखील ग्राहकाभिमुख व ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन सुविधांच्या बाबतीत घडत आले आहेत त्याचा फायदा करून घेणे इतका सरळ आहे. बँकेच्या कार्यालयीन वेळातच बँकेतील कामे उरकून घेणे आता कालबाह्य़ झाले आहे. पण नवीन तंत्रज्ञान सुविधांचा किती लोक वापर करतात हे पाहिले तर वाईट वाटते. अनेक बँकांतील कर्मचारीवर्गदेखील इंटरनेट सुविधा वापरीत नाहीत! गेल्या आठवडय़ातील लेखावर विलास जोशी यांच्यासारख्या अनेक स्टेट बँकेच्या माजी महाव्यवस्थापकांनी देखील समाधान व्यक्त करून ‘लोकसत्ता’सह माझे आभार मानले.
जनता सहकारी बँकेच्या बोरिवली शाखेत बसवलेले महाकाय यंत्र पास बुक भरून देते, चेक डिपॉझिट करायचे असतील तर तेही स्वीकारते, आपल्या खात्यात पसे (नोटा) भरायचे असतील तर तेही स्वीकारते! पसे काढायचे तर ती सुविधाही आहे. आणि हे सर्व काही कार्यालयीन वेळेनंतरही शक्य होते. काही बँकांत अशी यंत्रे बँकेच्या शाखेत बसवलेली असतात, त्यामुळे वेळेची मर्यादा पडतेच. पण उपरोक्त शाखेत एटीएम यंत्रासोबत हे यंत्र बसवले असल्याने रात्री दहा वाजताही मी माझी उपरोक्त कामे करून घेऊ शकतो. पसे भरले तर पावतीही देते हे यंत्र. यंत्रमानवच जणू!
डिमॅट खाते उघडताना ‘केवायसी’ कागदपत्रे सादर केली आहेत पण व्यक्तिश: खातेदाराचे In Person Verification  करण्यासाठी संभाव्य खातेदाराला डीपीकडे उपस्थित राहणे शक्य नसेल, तर वेब कॅमेऱ्याद्वारे डीपी ते काम करू शकतो. हे पण तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे व अशा प्रकाराला मान्यताही आहे. तात्पर्य कुणालाही नियमाचा बाऊ करून डिमॅट खाते उघडण्यापासून वंचित ठेवलेले नाही.
मध्यंतरी कोपरगाव येथे महिलांसाठीच्या एका व्याख्यानात अनेक भगिनी अशा होत्या की, बँकेने त्यांना एटीएम कार्ड दिलेली होती पण त्या ती वापरीत नव्हत्या. मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला की, तुमच्यापकी किती जणी फोन करू शकतात? सर्व जणींनी हात वर केले. माझ्याकडील स्लाइड शोमधील एका स्लाइडवर एटीएम यंत्राच्या की पॅडचा फोटो (चित्र) होते ते त्यांना दाखवले. तेच आकडे, प्रत्येक आकडय़ाची तीच जागा! ही तर फोनची बटणे असाच आविर्भाव प्रत्येकीच्या चेहऱ्यावर होता. एटीएम कार्डावर एक काळय़ा किंवा कोणत्याही रंगाचा ठिपका नवऱ्याकडून स्केच पेनाने रंगवून घ्या आणि त्याच दिशेने कार्ड यंत्रात सरकवून प्रथम पासवर्डचे चार आकडे दाबा. नंतर जे काही पर्याय दिसतात त्यापकी ‘पसे काढणे’ या बटणावर बोट दाबा आणि नंतर ३, ०, ० असे आकडे दाबा व त्यानंतर ‘होय’ या बटणावर बोट दाबा की शंभर रुपयांच्या तीन नोटा यंत्रातून बाहेर येतील.
सांप्रत जवळजवळ सर्व एटीएम यंत्रांत मराठी, इंग्रजी आणि हिंदी हे पर्याय असतात, त्यामुळे भाषेची अडचण येत नाही. हे सर्व स्लाइडवर लेझर पॉइंटरद्वारे त्यांना दाखवून देताच त्यांच्या चेहऱ्यावर जी एक आनंदाची स्मितरेषा उमटली ती म्हणजे मी दिलेल्या व्याख्यानाच्या पसंतीची पोचपावती होती! ‘हे सर्व सोपं आहे’ हा भाव त्यातून दिसत होता. बँकांच्या शाखांनी आठवडय़ातून एक तास वेळ काढून अशा प्रकारे आपल्या ग्राहकांना उपलब्ध सुविधा कशा वापरायच्या याचे प्रात्यक्षिक दाखवले, तर त्यांचेच किती काम वाचेल? आजमितीला शाखा शाखांतून वेडय़ासारखे लोक रांगा लावून पसे काढीत असतात आणि कामाचा ताण वाढल्याने कर्मचारी त्यांच्यावर डाफरत असतात. लाखो रुपये खर्च करून बँका जाहिराती देत असतात. त्यापेक्षा असे प्रयोग का करीत नाहीत? तालुक्याच्या ठिकाणची भाजी विकणारी महिला ती जाहिरात आयुष्यात कधी वाचणार नसते पण त्याच महिलेला तिच्यासारख्या अन्य महिलांसह शाखेत बोलावून वरीलप्रमाणे एकदा हे सर्व समजावून सांगितले तर किती बरे होईल. चाकोरीबाहेर जायची कुणाला इच्छाच नाही त्यामुळे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी सध्या अवस्था आहे!
चांगल्या कामासाठी सहकार्य करणारे अनेक सज्जन असतात त्याचा पडताळा नुकताच आला. महाराष्ट्रात १२ हजारहून जास्त वाचनालये आहेत, अगदी गावोगावीदेखील. या वाचनालयांच्या माध्यमातून आíथक साक्षरता कार्यक्रम केले तर कमी दिवसांत हजारो लोकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. कारण मुंबईत बसून केवळ एकदा कार्यक्रम ठरविण्यासाठी एखाद्या गावी जाणे आणि परत कार्यक्रमाचे दिवशी जाणे आíथकदृष्टय़ा आणि वेळेच्या दृष्टीने गरसोयीचे आहे. त्यामुळे वाचनालयांनीच पुढाकार घेऊन असे कार्यक्रम आयोजित केले तर व्याख्यान द्यायला मी तिथे जाईन आणि याबाबत वाचनालयांवर कसलाही आíथक भार असणार नाही. हा प्रस्ताव घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रंथ संचालनालयाचे प्रमुख संचालक ननान्से साहेब यांना मी भेटलो असता माझ्या प्रस्तावाला त्वरित होकार देऊन त्यानुसार सार्वत्रिक स्वरूपाचे एक पत्र देण्याचे त्यांनी मान्य केले. खरे तर त्यांच्या नित्य चाकोरीबाहेरील ही बाब असूनही केवळ लोकशिक्षणाचे काम आम्ही करीत आहोत त्यात आपलेही काही योगदान असावे ही भावना त्यातून व्यक्त झाली. अशी भली माणसे सरकारात सर्वत्र असतील तर काय बहार येईल! या प्रस्तावानुसार पहिला या स्वरूपाचा आíथक साक्षरता कार्यक्रम दापोली येथे होणार आहे.