सलग दोन महिने घसरल्यानंतर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनाचा दर वधारला आहे. एप्रिलमध्ये हा दर ३.४ टक्के नोंदला गेला आहे.
खनिकर्म, ऊर्जा क्षेत्रासह निर्मिती क्षेत्र तसेच भांडवली वस्तूंचे उत्पादन वधारल्यामुळे यंदा एकूण औद्योगिक उत्पादन वधारले आहे. वर्षभरापूर्वी एप्रिल २०१३ मध्ये हा दर १.५ टक्के होता. एप्रिलमध्ये २२ उद्योग क्षेत्रांपैकी १४ उद्योगांनी वाढ नोंदविली आहे. यंदा भाडंवली वस्तू उद्योगाची वाढ राखली गेली असली तरी ग्राहकोपयोगी वस्तूनिर्मिती मात्र घसरली आहे.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेने सुधारित केलेला मार्चमधील दरामध्येही फार फरक पडलेला नाही. तो ०.५ टक्के राहिला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दर सतत घसरतच होता. त्यानंतर केवळ जानेवारीतील किरकोळ वाढीनंतर पुढील दोन महिने पुन्हा तो नकारात्मक राहिला. औद्योगिक उत्पादनात सर्वाधिक ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ एप्रिलमध्ये १५.७ टक्के राहिली आहे. वर्षभरापूर्वी ती शून्य स्थितीत होती. खनिकर्म क्षेत्राची वाढ १.२ टक्के आहे. ऊर्जानिर्मिती क्षेत्रदेखील दुहेरी आकडय़ात, ११.९ टक्के झाले आहे.