सणासुदीच्या तोंडावर धोक्याचे अर्थ-संकेत

देशातील औद्योगिक उत्पादन दराने तिमाहीचा तळ गाठला आहे. खनिकर्म, भांडवली वस्तू क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक ऑगस्टमध्ये ४.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी उशिरा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाचा औद्योगिक उत्पादन दर हा मेमधील ३.९ टक्क्यानंतरचा किमान दर आहे. यापूर्वी, जून व जुलैमध्ये तो अनुक्रमे ६.८ व ६.५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१७ मध्ये औद्योगिक उत्पादन दर ४.८ टक्के नोंदला गेला आहे. ऑगस्टमध्ये खनिकर्म क्षेत्र ०.४ टक्क्यांनी रोडावले आहे. वर्षभरापूर्वी ते ९.३ टक्क्यांवर झेपावले होते. त्याचबरोबर भांडवली वस्तू वर्षभरापूर्वीच्या ७.३ टक्क्यांच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये ५ टक्क्यांवर आले आहे.

निर्मिती क्षेत्र ऑगस्टमध्ये ४.६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यात वार्षिक तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे. तर ऊर्जानिर्मिती यंदा काही प्रमाणात कमी होत ७.६ टक्क्यांवर स्थिरावली आहे. पायाभूत/बांधकाम वस्तू क्षेत्रातील वाढ ७.८ टक्के नोंदली गेली आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंमधील वाढ ५.२ टक्के राहिली आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात गणले जाणाऱ्या २३ पैकी १६ उद्योग क्षेत्रांचा प्रवास ऑगस्ट २०१८ मध्ये वार्षिक तुलनेत सकारात्मक राहिला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यांत औद्योगिक उत्पादन दर मात्र वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील २.३ टक्क्यांच्या तुलनेत दुपटीहून अधिक, ५.२ टक्के नोंदला गेला आहे.

वाढत्या इंधनदराचा महागाईवर परिणाम

वाढत्या इंधनाच्या किमती आणि अन्नधान्याच्या दरांमुळे सप्टेंबरमधील महागाई दरात काहीशी वाढ नोंदली गेली.  सप्टेंबरमधील किरकोळ ग्राहक किंमतीवर आधारीत निर्देशांक ३.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. आधीच्या महिन्यात, ३.६९ टक्के असा हा दर गेल्या १० महिन्यांतील किमान पातळीवर होता. तर वर्षभरापूर्वी, सप्टेंबर २०१७ मध्ये तो ३.२८ टक्के नोंदला गेला होता. यंदा अन्नधान्याच्या किमती ०.५१ टक्के तर इंधन तसेच ऊर्जा दर ८.४७ टक्क्यांनी वाढले आहेत. शुक्रवारी जाहीर झालेला महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे निश्चित ४ टक्के मर्यादेच्या आतच आहे.