बाजार-साप्ताहिकी ’: सुधीर जोशी

मागील सप्ताहात सुरू झालेली बाजाराची घोडदौड मंगळवारच्या क्षणभर विश्रांतीनंतर पुढे सुरूच राहिली. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी, अमेरिका व चीनने व्यापार निर्बंधकमी करण्याचे दिलेले संकेत बाजाराच्या पथ्यावर पडले. या तेजीला सरकारने स्थावर मालमत्ता क्षेत्राबाबत केलेल्या सुधारणांनी इंधन पुरविले. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी २५ हजार कोटींचा प्रारंभिक कोष असलेल्या ‘एआयएफ कॅटेगरी २’ वैकल्पिक निधीची स्थापना करून सरकारने स्थावर मालमत्ता उद्योगाला दिलासा दिला आहे. दिल्लीनजीकच्या भागात दोन लाख कोटींचे तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात ९७ हजार कोटींचे प्रकल्प पुरेशा वित्तपुरवठय़ाअभावी रेंगाळले आहेत. आता या प्रकल्पांना चालना मिळेल. भविष्यात या निधीमध्ये वाढ होऊन नवीन रोजगारनिर्मिती होईलच. पण बँका व गृह वित्त कंपन्यांचे अनुत्पादित कर्ज कमी होण्यासही मदत होईल. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मूडीज्ने भारताच्या पत मूल्यांकनात केलेल्या कपातीमुळे विक्रीचा दबाव आला. या घसरणीमुळे सेन्सेक्समध्ये १५८ अंशांची तर निफ्टीमध्ये १८ अंशांची किरकोळ साप्ताहिक वाढ होऊ शकली.

नवीन घर खरेदीसाठी नोंदणीकृत किंवा बांधकाम क्षेत्रातील मोठय़ा व्यावसायिकांकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. रेरा कायदा व रोखीच्या व्यवहारांवरील र्निबधांमुळे लहान खासगी बांधकाम व्यावसायिकांचे उद्योग संकटात आहेत. गेली काही वष्रे मंदीचा सामना करणाऱ्या या क्षेत्रातील गोदरेज प्रॉपर्टीजमधे गुंतवणुकीची संधी आहे. दुसऱ्या तिमाहीत विक्रीत घट झाल्यामुळे समभागामधे घसरण झाली आहे, परंतु नफ्याचे प्रमाण वाढले आहे व नवीन घरांच्या खरेदीच्या नोंदणीतही वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या फक्त दहा टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांकडे आहे. या समभागांमध्ये गुंतवणुकीची संधी आहे.

इन्फोसिसवर आलेले संशयाचे ढग व येस बँकेवर गेले वर्षभर घोंगावणारे वादळ या आठवडय़ात काहीसे शमले. इन्फोसिसच्या व्यवस्थापकांनी प्रथमदर्शनी गरप्रकारात काही तथ्य नसल्याचे जाहीर केले तर येस बँकेत परदेशी संस्थानी गुंतवणुकीत स्वारस्य दाखविल्याच्या तसेच भारतातील ‘बिग बुल’नी गुंतवणूक केल्याच्या बातम्यांमुळे दोन्ही समभागांनी उभारी घेतली. दिवाळीच्या मुहूर्त खरेदीसाठी सुचविलेल्या या दोन्ही समभागांनी त्वरित फायदा मिळवून दिला.

मंदीच्या पाश्र्वभूमीवर टायटन कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील उलाढालीत व नफ्यात किरकोळ वाढ झाली. बाजारात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटून कंपनीच्या समभागात १० टक्क्यांची घसरण झाली. नजीकच्या काळात मोठी घसरण झाली तर ती गुंतवणूकदारांना खरेदीची संधी असेल.

गोदरेज कन्झुमरच्या तिमाही निकालांत साबण, सौँदर्य प्रसाधनाच्या विक्री व नफ्यातील घट, परदेशातील व्यवसाय व घरगुती कीटकनाशाच्या वाढणाऱ्या नफ्यांमुळे भरून निघाली आहे. पण ही कामगिरी पुढेही अशीच सुरू राहील का हे पाहणे महत्वाचे ठरेल. सध्याच्या बाजारभावाला थोडी विक्री करून पुन्हा खरेदीचा मोका मिळू शकेल. पुढील आठवडय़ात मंगळवारच्या सुटीमुळे बाजाराचे कामकाज पुन्हा एकदा चार दिवसांचेच राहील आणि अशोक लेलॅंड, बँक ऑफ बडोदा सारख्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवर बाजार प्रतिक्रिया देईल.

 sudhirjoshi23@gmail.com