सणांपूर्वी सोने आयातीतील घट लक्षणीय

गेल्या महिन्यात देशाची निर्यात २५.६७ टक्क्यांनी वाढून २८.६१ अब्ज डॉलर झाली आहे. मात्र त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये आयातीतही वाढ नोंदली गेली आहे.

आयातीमध्ये सोने आयात ५ टक्क्यांनी कमी होत १.७१ अब्ज डॉलर झाली आहे. सण – समारंभाच्या सुरुवातीला घसरलेल्या आयातीचे प्रमाण ही बाब लक्षणीय मानली जात आहे. तर तेल आयात १८.४७ टक्क्यांनी वाढून ८.१८ अब्ज डॉलर झाली आहे.

गेल्या महिन्यात देशाची आयात १८.०९ टक्क्यांनी वाढून ३७.६ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ३१.८३ अब्ज डॉलर होती.

आयात-निर्यातीतील दरी मानली जाणारी भारताची व्यापार तूट सप्टेंबरमध्ये ८.९८ अब्ज डॉलपर्यंत आली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये ती किरकोळ अधिक, ९ अब्ज डॉलर होती.

एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये एकूण निर्यात ११.५२ टक्क्यांनी विस्तारत १४७.१८ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. याच पहिल्या अर्ध वित्त वर्षांत आयात २५.०८ टक्क्यांनी वाढून २१९.३१ अब्ज डॉलर झाली आहे.