आधुनिक तंत्रज्ञानात्मक उपकरणांद्वारे उच्च गुणवत्तेची नेत्रनिगेची सेवा तुलनेने अल्पदरात बडय़ा महानगरबाहेरील रुग्णांना उपलब्ध करून देण्याची उत्तर भारतातील काही राज्यांत यशस्वी ठरलेला व्यावसायिक आराखडा महाराष्ट्रातही आजमावून पाहण्याचे ‘आय क्यू’ या सुपरस्पेशालिटी नेत्र रुग्णालयाने ठरविले आहे. राज्यात औरंगाबाद, नाशिक आणि जळगावमधून सुरुवात करीत पुढील काही वर्षांत १५ ते २० रुग्णालये थाटण्याचा या नवोद्योगी (स्टार्टअप) कंपनीचे नियोजन आहे.
हरयाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांत आय क्यूची सध्या ४२ अत्याधुनिक रुग्णालये कार्यरत असल्याचे, तिचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजत गोयल यांनी सांगितले. बॉश अँड लॉम्ब या कंपनीत जबाबदारीच्या पदावरील सेवेचा अनुभव आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अजय शर्मा यांच्या सहयोगातून त्यांनी २००७ साली ही कंपनी स्थापित केली. ‘आयएफसी’सह अन्य चार बडय़ा विदेशी गुंतवणूकदारांचे भांडवली सहभागासह आर्थिक पाठबळ कंपनीने मिळविले आहे.
विद्यमान २०१६-१७ सालासाठी कंपनीने १० ते १५ कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचे नियोजन आखले असून, त्यातील बहुतांश गुंतवणूक महाराष्ट्रातील विस्तारावर खर्ची पडणार आहे, असे गोयल यांनी सांगितले. नाशिक, औरंगाबाद, जळगाव ही तीन रुग्णालये मे अखेरीस कार्यान्वित होतील. या शिवाय प्रत्येकी एक ते दीड कोटी गुंतवणुकीतून अन्य जिल्ह्य़ांमध्ये रुग्णालयाच्या स्थापनेसाठी योग्य जागेची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजित आराखडय़ानुसार १५ रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास, राज्यात ५०० जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल, साधारण ५० डॉक्टरांसाठी कायमस्वरूपी पदे निर्माण होतील, असे गोयल यांनी सांगितले.