निश्चलनीकरणानंतरची ५० दिवसांची मुदत संपली. ती संपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षांच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधानांनी कल्याणकारी योजनांची जंत्री सादर केली. निश्चलनीकरणामुळे अर्थव्यवस्थेची नेमकी किती हानी झाली, पुढील वर्षांचे अर्थवृद्धीचे अंदाज नेमके किती खालावले या मुद्दय़ावर ‘लोकसत्ता’ने काही उद्योजकांशी संवाद साधला. यानुसार निवडक उद्योगांचा नव्या वर्षांबाबतचा दृष्टिकोन आजपासून ‘वर्षांरंभ २००१७’ मध्ये.

मागील वर्षांत आर्थिक सेवा क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपन्यांचा बोलबाला होता. तंत्रज्ञान क्षेत्रातील या उद्योग गटातील कंपन्यांचे ‘फिनटेक’ या नावाने बारसेदेखील गेल्या वर्षांत झाले. २०१६ मध्ये आमच्या कंपनीची विक्री ५३% दराने वाढली. निश्चलनीकरणामुळे या क्षेत्रातील उत्पादनांची व सेवांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली. सरकारच्या ‘डिजिटल पेमेंट’वर भर देण्याच्या धोरणाचा फायदा ‘फिनटेक’सारख्या कंपन्यांना होणारच आहे; परंतु निश्चलनीकरणामुळे हक्काचे ग्राहक असलेल्या वित्तीय सेवा कंपन्यांचा नफा घटण्याचा धोका असल्यामुळे या कंपन्या नवीन माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित खर्चासाठी कितपत तयार होतील, याबद्दल शंका वाटते. आमचा मागील वर्षी वृद्धीदर ५५ टक्के असूनही २०१७ मध्ये वृद्धी दर ४० ते ४५ टक्के दरम्यान असेल.

२०१७ हे वर्ष तांत्रिकदृष्टय़ासुद्धा क्रांतीकारी असेल. सध्या एका ई व्ॉलेटमधून दुसऱ्या ई वॅलेटमध्ये निधी हस्तांतरण सुविधा नाही. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘क्लीअरिंग हाऊस’च्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होईल. ई व्ॉलेट वापरण्यास ज्या काही मर्यादा आहेत त्या रिझव्‍‌र्ह बँकेकडून एका ई व्ॉलेटमधून दुसऱ्या ई वॅलेटमध्ये निधी हस्तांतरणास असलेला अडथळा दूर झाल्यास ई वॅलेट वापरासंबंधीच्या कक्षा नक्कीच रुंदावतील. सध्या दोन ते तीन ई वॅलेटपुरता मर्यादित असलेला व्यवसाय विस्तृत होण्याची आशा या नव्या वर्षांत आहे. ‘स्टेट बँक बडी’, ‘चिल्लर’ या सारखी निधी हस्तांतरण अ‍ॅप अनेक बँकांकडून त्यांच्या ग्राहकांसाठी विकसित होणार असल्याने सध्याच्या ई वॅलेट कंपन्याचा बाजार हिस्सा कमी होण्याची शक्यता २०१७मध्ये आहे.

निश्चलनीकरणामुळे  सरकारने ३००० पर्यंतच्या देयकांसाठी डिजिटल पेमेंट सक्तीचे केले आहे. या कारणाने ग्राहकांना जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटचा वापर करण्याची आवश्यकता भासणार आहे. यामुळे डिजिटल पेमेंट ही मक्तेदारी तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापर करणाऱ्या बॅंकापुरती मर्यादित न राहता सामान्यांच्या आवाक्यात आली आहे. जगभरात ब्रिटन हा देश ई वॅलेटच्या वापरात प्रथम क्रमांकावर आहे. भारतात २०१७ मध्ये निश्चलनीकरणामुळे ई वॅलेट व डिजिटल पेमेंटच्या वापरात मोठी वाढ दिसून येईल हे नक्की. भारतात सध्या डिजिटल पेमेंट ई वॅलेटपुरता मर्यादित असलेला ‘फिनटेक’चा वापर विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक आदी उद्योगात विस्तारेल याबद्दल शंकाच नाही. २०१७ हे वर्ष भारतातील ‘फिनटेक’सारख्या कंपन्यासाठी क्रांतीकारी वर्ष म्हणून ओळखले जाईल.