अन्नधान्य तसेच इंधन गटातील वस्तू स्वस्त झाल्याने घाऊक महागाई दर गेल्या चार महिन्यांच्या किमान स्तरावर येऊन ठेपला आहे. मार्चमधील हा दर अवघ्या एक टक्क्य़ावर विसावला आहे.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर यापूर्वीच्या महिन्यात, फेब्रुवारीमध्ये २.२६ टक्के; तर वर्षभरापूर्वी, मार्च २०१९ मध्ये ३.१० टक्के होता.

वाणिज्य व उद्योग खात्यानुसार, यंदाच्या मार्चमध्ये अन्नधान्याच्या महागाई दर ४.९१ टक्क्य़ांवर स्थिरावला आहे. वर्षभरापूर्वी तो ७.७९ टक्के होता. तर इंधन व ऊर्जा गटातील वस्तूंच्या किंमती १.७६ टक्क्य़ांपर्यंतखाली आल्या आहेत. निर्मित वस्तूंच्या किंमती गेल्या महिन्यात ०.३४ टक्क्य़ांपर्यंत स्थिरावल्या आहेत.

यंदाच्या मार्चमध्ये नोंदला गेलेला घाऊक महागाई दर हा नोव्हेंबर २०१९ नंतरचा किमान ठरला आहे. यापूर्वी तो ०.५० टक्का असा कमी स्तरावर होता.

भाज्यांच्या किंमती २९.९७ टक्क्य़ांवरून थेट ११.९० टक्क्य़ांवर आल्या आहेत. कांद्याचे दर मात्र ११२.३१ टक्के असे वरच्या टप्प्यावर कायम आहेत. डाळींच्या किंमती १२.१२ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत.

मार्चमध्ये निर्यात-आयातीत घसरण

गेल्या वित्त वर्षांच्या अखेरच्या महिन्यात देशातील निर्यात तसेच आयातीत घसरण नोंदली गेली आहे.

मार्च २०२० मध्ये देशाची निर्यात २१.४१ अब्ज डॉलर झाली असून त्यात वार्षिक तुलनेत ३४.५७ टक्के घसरण झाली आहे. तर २०१९-२० या गेल्या एकूण वित्त वर्षांत आयात ४.७८ टक्क्य़ांनी कमी होत ३१४.३१ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

निर्यात-आयातीतील दरी मानली जाणारी व्यापार तूट गेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या महिन्यात ९.७६ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती ११ अब्ज डॉलर होती. २०१९-२० या एकूण वित्त वर्षांत व्यापार तूट १५२.८८ अब्ज डॉलर राहिली आहे. आधीच्या वर्षांतील १८४ अब्ज डॉलरच्या तुलनेत ती यंदा कमी आहे.

जागतिक मंदी,कोविड-१९ संकटामुळे निर्यात घसरली असल्याचे वाणिज्य व उद्योग खात्याने स्पष्ट केले आहे. जवळपास सर्वच स्तरावर वस्तूंची मागणी आणि पुरवठय़ाची साखळी विस्कळीत झाली असल्याचे नमूद करण्यात आले.

मार्चमध्ये आयात २८.७२ टक्क्य़ांनी कमी होत ३१.१६ अब्ज डॉलर नोंदली गेली. गेल्या एकूण वित्त वर्षांत ती ९.१२ टक्क्य़ांनी कमी होत ४६७.१९ अब्ज डॉलरवर ठेपली.