सर्वाधिक बोली लावूनही ‘आयएचएच’ स्पर्धेबाहेर!

नवी दिल्ली : व्यवसाय विक्रीसाठी आलेल्या बोलींमध्ये फोर्टिसच्या संचालक मंडळाने हिरो समूहाला पसंती दर्शविली आहे. डाबर प्रवर्तक बर्मन कुटुंबीयांसह हिरो एंटरप्राइज इन्व्हेस्टमेंट ऑफिस या हिरो समूहातील कंपनीने संयुक्तपणे फोर्टिसकरिता प्रति समभाग १६७ रुपये खरेदीचा दिलेला प्रस्ताव स्वीकारला गेला आहे.

फोर्टिस हेल्थकेअरच्या खरेदीकरिता कंपनीच्या संचालक मंडळापुढे पाच प्रस्ताव आले. पैकी स्पर्धक आयएचएच हेल्थकेअरचा सर्वाधिक बोलीचा प्रस्तावही फोर्टिसने नाकारला. तर फोसन हेल्थ होल्डिंग्जचा प्रति समभाग कमी मूल्याचा प्रस्तावही बाजूला पडला.

याव्यतिरिक्त मणिपाल-टीपीजी व केकेआर-रेडिएंट लाइफ केअरनेही फोर्टिस हेल्थकेअरच्या खरेदीसाठी उत्सुकता दर्शविली होती.

फोर्टिसच्या नऊ जणांच्या संचालक मंडळातील पाच सदस्यांनी हिरो-बर्मनच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर अन्य चारपैकी तीन संचालकांनी अन्य प्रस्तावाकरिता कौल दिला. मात्र तो कौल नेमका कुणासाठी हे स्पष्ट होऊ शकले नाही.

शुक्रवारी मंजूर झालेल्या संचालक मंडळाच्या प्रस्तावाकरिता आता फोर्टिसच्या भागधारकांची सभा येत्या महिन्याभरात होण्याची शक्यता आहे.

हिरोचे मुंजाल आणि बर्मन यांनी पहिल्या टप्प्यातील ८०० कोटी रुपयांव्यतिरिक्त १,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारीही दर्शविली आहे. फोर्टिसअंतर्गत येणाऱ्या एसआरएल या आरोग्य निदान केंद्रांच्या साखळी व्यवसायाच्या संचालक मंडळावरील प्रवर्तक मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांनी राजीनामा देण्याची सूचना टेम्पेस्ट यांनी केली आहे.

दरम्यान, फोर्टिस हेल्थकेअरचा समभाग शुक्रवारअखेर मुंबईच्या शेअर बाजारात जवळपास ३ टक्क्यांनी आपटला. दिवसअखेर समभाग १४८.४० रुपयांवर स्थिरावला.

‘आता सामान्य भागधारक निवाडा करतील’

आम्ही खरेदीकरिता फोर्टिसकडे सर्वाधिक बोलीचा प्रस्ताव देऊनही तो नाकारण्यात आल्याबद्दल निराशा झाली आहे, असे आयएचएच हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॅन सी लेंग यांनी म्हणाले. याबाबत आम्ही आता थेट कंपनीच्या भागधारकांकडेच न्याय मागू, असेही ते म्हणाले. तर हिरो-बर्मनचा १,८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव स्वीकारताना फोर्टिसच्या संचालक मंडळाने, कंपनीची आर्थिक स्थिरता आणि तरलता या बाबीही हेरल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबत आम्ही तज्ज्ञ समिती, वित्तसंस्था तसेच विधि सल्लागार यांचेही मत विचारात घेतल्याचे फोर्टिसचे एक संचालक ब्रायन टेम्पेस्ट यांनी सांगितले.