किमती आभाळाला पोहोचल्या असल्या तरी देशातील इंधनाची मागणीतील चढ सुरूच असून, आता या मागणीने करोनापूर्व पातळीही मागे टाकली आहे. ग्राहक उपभोगातील ही वाढ अर्थव्यवस्थेच्या दमदार फेरउभारीलाच प्रतिबिंबित करते, असे आघाडीच्या तेल कंपनीच्या प्रमुखांनी मंगळवारी प्रतिपादन केले.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये करोना टाळेबंदीपश्चात देशातील पेट्रोल-डिझेल इंधनाची विक्री जवळपास निम्म्यावर, म्हणजे ४५.८ टक्क््यांनी घसरली होती. टाळेबंदीतील टप्प्याटप्प्याने शिथिलतेनंतर सर्वप्रथम पेट्र्रोलची मागणी वाढू लागली आणि आता डिझेलनेही करोनापूर्व मागणीचा स्तर मागे टाकला आहे.  स्वयंपाकाचा गॅस अर्थात एलपीजीची मागणीही उत्तरोत्तर वाढत आहे. केवळ विमानासाठी लागणारे इंधन अर्थात ‘एटीएफ’ची मागणी पूर्वपदावर येऊ शकलेली नाही, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी सांगितले.

मार्चच्या प्रथम पंधरवड्यात पेट्रोलने करोनापूर्व मागणीचा स्तर नोंदविलेला दिसतो, तर डिझेलच्या विक्रीत गतवर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ७.४ टक्क््यांची वाढ दिसून येते, अशी वैद्य यांनी माहिती दिली.

विमान इंधनविक्रीत वाढीची मात्र प्रतीक्षा 

प्रवासी विमानांची उड्डाणे देशव्यापी टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे बंद आणि आताही ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नसल्याने एटीएफची विक्री अद्याप सामान्य होऊ शकलेली नाही. एटीएफच्या विक्रीने सामान्य स्तरावर येण्यासाठी तीन-चार महिने जाऊ शकतील. लसीकरणाची मोहीम देशभरात गतिमानतेने राबविली जाईल आणि त्यातून चांगले परिणाम दिसून येतील, अशी आशा असल्याचे श्रीकांत माधव वैद्य यांनी सांगितले. टाळेबंदीपश्चात एटीएफची विक्री तब्बल ८० टक्क््यांनी गडगडली होती. मार्चच्या सुरुवातीला ही घसरण ३६.५ टक्के अशी सुधारली आहे.