तीन आठवडय़ांतील सर्वात मोठी २५७ अंशांची आपटी
गेल्या तीन सप्ताहातील सर्वात मोठी आपटी नोंदविताना सेन्सेक्स त्याच्या २७ हजार या गेल्या सात महिन्यांच्या वरच्या टप्प्यावरूनही गुरुवारी झालेल्या व्यवहारात ढळला. २५७.२० अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक २६,७६३.४६ वर थांबला, तर ६९.४५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ८,२०३.६० पर्यंत थांबावे लागले.
बाजारातील गुरुवारच्या मोठय़ा घसरणीला अनेक निमित्ते मिळाली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची आगामी बैठकीपूर्वी अर्थवृद्धीबाबत चिंता, प्रति पिंप ५२ डॉलरपुढे खनिज तेलाचे व्यवहार, डॉलरच्या तुलनेत घसरणारे रुपयाचे मूल्य, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा दबाव हे सर्व घटक दिवसअखेर सेन्सेक्सला २७ हजाराखाली खेचण्यास कारणीभूत ठरले.
यापूर्वीच्या सलग दोन व्यवहारातील मिळून सेन्सेक्सची वाढ २४३.२१ अंश राहिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवातच २७ हजाराखालील २६,९९४.४८ या स्तराने झाली. सत्रात सेन्सेक्स २६,६९२.३५च्या नीचांकापर्यंत आपटला. तथापि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने मात्र दिवसअखेर ८,२०० ची पातळी सांभाळून ठेवली.
सेन्सेक्समध्ये वाहन क्षेत्रातील समभागांना मूल्य घसरणीला सामोरे जावे लागले. मेमधील कमी वाहन विक्रीचा फटका बाजारात हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकीला अधिक बसला. मुंबई निर्देशांकातील १८ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक २ टक्क्य़ांपर्यंतची घसरण माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, पोलाद, आरोग्यनिगा, तेल व वायू, ऊर्जा यामध्ये झाली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांत संमिश्र हालचाल नोंदली गेली.
शुक्रवारी, चालू सप्ताहअखेरच्या व्यवहारात बाजारातील व्यवहार हे प्रामुख्याने औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीवर होण्याची शक्यता आहे. एप्रिलमधील देशाच्या निर्मिती क्षेत्राची कामगिरी यावेळी स्पष्ट होणार आहे.
खनिज तेल पिंपामागे ५३ डॉलरकडे अग्रेसर
लंडन : आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचा दर प्रवास आता ५३ डॉलर प्रति पिंपापर्यंत पोहोचला आहे. इंधनाचा हा ऑक्टोबर २०१५ नंतरचा सर्वात वरचा दर स्तर आहे. २०१६ च्या सुरुवातीला १३ वर्षांच्या तळ तुलनेत खनिज तेल आता जवळपास दुप्पट झाले आहे. इंधनसक्षम होऊ पाहणाऱ्या अमेरिकेच्या काही भागातील तेल उत्पादन रोडावल्याने गेल्या काही दिवसांपासून खनिज तेल ५१ डॉलर प्रति पिंपापुढील प्रवास करत आहे.