टाळेबंदी शिथिल होऊनही चढय़ा दरांमुळे जुलै ते सप्टेंबरमध्ये सोने मागणी ३० टक्क्यांनी रोडावून ८६.६ टन नोंदली गेली आहे. मूल्य प्रमाणात ती ४ टक्क्यांनी घसरून ३९,५१० कोटी रुपये झाली. मात्र गुंतवणूक म्हणून अर्थसंकट कालावधीत ग्राहकांकडून मागणी ५२ टक्क्यांनी वाढून ३३.८ टनापर्यंत गेली आहे. मूल्याच्या प्रमाणात ती १०७ टक्क्यांनी झेपावून १५,४१० कोटी रुपये झाली आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेचे जुलै-सप्टेंबर २०२० मधील कलनिरीक्षण अहवाल गुरुवारी प्रसिद्ध झाला. त्यानुसार भारतीयांनी सलग दुसऱ्या तिमाहीत सोन्याकडे पाठ केली असली तरी गुंतवणूकदारांचा तो पसंतीचा पर्याय ठरला आहे. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत सोन्याची गुंतवणूक म्हणून मागणी वर्षभरापूर्वीच्या, याच कालावधीतील २२.३ टनाच्या तुलनेत थेट ५२ टक्क्याने वाढली आहे. तर मूल्याबाबत जुलै-सप्टेंबर २०१९ मधील ७,४५० कोटी रुपयांच्या तुलनेत ती तब्बल १०.७ टक्के झेपावली आहे.

गेल्या तिमाहीत मौल्यवान धातूच्या दागिन्यांसाठीची भारतीयांची मागणी ४८ टक्क्यांनी कमी होत ५२.८ टन अर्थात २४,१०० कोटी रुपये झाली. सुरक्षितता म्हणून सोन्याच्या चिपा आणि नाण्यांसाठीची मागणी ५१ टक्क्यांनी विस्तारत ३३.८ टन झाली आहे. या दरम्यान सोन्याच्या पुनर्वापराचे प्रमाण १४ टक्क्यांनी वाढून ४१.५ टन झाले आहे.