२०१५ मध्ये १,००० टन आयात होण्याची भीती
स्थानिक पातळीवर तसेच जागतिक स्तरावरील मौल्यवान धातूंच्या दर पडझडीमुळे भारताची सोन्याची आयात यंदा १,००० टनचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मौल्यवान धातू क्षेत्रातील देशव्यापी संघटना असलेल्या ‘अखिल भारतीय हिरे व दागिने व्यापार मंचा’ने ही भीती व्यक्त केली आहे.
भारत हा जगातील दुसरा मोठा सोने आयातदार देश आहे. याबाबत चीनचा क्रमांक पहिला लागतो. भारताने २०१४ मध्ये ९०० टन सोने आयात केली आहे. सरकारच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी वाढत्या सोने आयात रोखण्याच्या उपाययोजना सुरू आहेत.
सोन्याच्या आयातीबाबत संघटनेचे संचालक बच्छराज बामलवा म्हणाले की, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचे दर कमालीचे ढासळले आहेत. त्यामुळे मौल्यवान धातूला मागणी नोंदली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, संपूर्ण चालू वर्षांत १,००० टन सोने आयात होऊ शकते. तसे झाले तर ही देशाच्या इतिहासातील सर्वाधिक आयात ठरेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात प्रती औन्स १,१०० डॉलरखाली आलेले सोन्याचे दर हे गेल्या पाच वर्षांच्या तळात पोहोचले आहेत. असे असले तरी दरांबाबत त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर होण्याची शक्यता कमी असल्याचे नमूद करतानाच संघटनेने डॉलरच्या तुलनेत रुपयाचा घसरता प्रवास अधिक परिणामकारक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चालू वर्षांत जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान देशाने ८५० टन सोने आयात केली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावथीत ती ६५० टन होती. २०१५ च्या अखेरच्या महिन्यात भारताची सोने आयात १५० ते २०० टन होण्याची शक्यता बामलवा यांनी व्यक्त केली आहे. डिसेंबर २०१४ मध्ये सोने आयात ३०० टन होती.
सणांच्या नेमक्या हंगामातील सोने कल अद्याप स्पष्ट झाला नसला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ मध्ये वार्षिक तुलनेत सोने आयात कमी राहण्याची शक्यताही बामलवा यांनी व्यक्त केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेनेही या कालावधीत सोने आयात मंदावण्याचा अंदाज यापूर्वीच बांधला आहे.
भारतात सध्या सोन्याचे दर तोळ्यासाठी २७ हजार रुपयांपर्यंत आहेत. मौल्यवान धातूने ३१ हजार हा दर उच्चांक यापूर्वी गाठला आहे. कमी मान्सून आणि एकूण औद्योगिक, ग्राहक क्षेत्रात नसलेल्या उत्साहापोटी यंदा धातूचे दरही फार वाढले नाहीत तसेच त्यांची मागणीही लक्षणीय ठरलेली नाही.

रुपयात मोठी आपटी
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी तब्बल २५ टक्क्य़ांनी आपटला. ६६.५७ खाली येताना स्थानिक चलन गेल्या अडीच महिन्यांच्या तळात विसावले. बुधवारच्या सुटीनंतर चलनाचा सकाळचा प्रवास ६६.३५ असा खालच्या स्तरावरच सुरू झाला. सत्रात रुपया ६६.६७ पर्यंत घसरला. त्याचा सत्रातील प्रवास ६६.३४ ते ६६.६७ राहिला. दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत ०.३८ टक्क्य़ांची घसरण नोंदविताना रुपया अडीच महिन्यांच्या तळात स्थिरावले. मंगळवारी चलन ६६.३२ वर बंद झाले होते. रुपयाचा यापूर्वीचा, ७ सप्टेंबर रोजीचा नीचांक ६६.८२ होता.
सोने, चांदीदरात वाढ
मुंबई : मौल्यवान धातूच्या दरात गुरवारी मोठी वाढ राखली गेली. स्टॅण्डर्ड सोन्याचा दर प्रती तोळा ७० रुपयांनी उंचावत २५,३९५ वर गेला. तर शुद्ध प्रकारच्या सोन्याचा दर १० ग्रॅममागे त्याच प्रमाणात वाढत २५,४७५ रुपयांवर पोहोचले. गेल्या सत्रांपासून सातत्याने घसरत असलेल्या चांदीच्या दरातही गुरुवारी मोठी उसळी अनुभवली गेली. पांढऱ्या धातूचा किलोचा भाव एकदम ३४५ रुपयांनी वाढत ३५,०३० पर्यंत गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने गेल्या साडे पाच ते सहा वर्षांच्या खोलात गेले आहेत. ते आता प्रती औन्स १,००० डॉलरवर येऊन ठेपले आहेत.