13 December 2019

News Flash

चांदीत एका दिवसांत १,२०० रुपयांची उसळी;

जागतिक तेजीच्या पाश्र्वभूमीवर या मौल्यवान धातूंच्या भारतातील किमतीनेही चढता क्रम कायम ठेवला आहे.

सोनेही तोळ्यामागे ३८,०००च्या वेशीवर!

मुंबई : भांडवली बाजारात निर्देशांकांची मोठी पडझड आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची गटांगळी सुरू असताना, मौल्यवान धातू सोने-चांदी मात्र तुफान तेजीवर स्वार दिसत आहेत. मंगळवारच्या व्यवहारात मुंबईतील सराफ बाजारात स्टॅण्डर्ड सोने तोळ्यामागे ६०० रुपयांची, तर चांदी किलोमागे तब्बल १,२०० रुपयांनी उसळून अनुक्रमे ३७,७९५ रुपये आणि ४४,२८० रुपये पातळीवर गेली.

जागतिक अर्थ-राजकीय अनिश्चिततेने समभाग बाजाराला मंदीचे ग्रहण लागले असताना, अशा अस्थिर स्थितीत सुरक्षित आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या सोने-चांदीकडे गुंतवणूकदारांचा होरा वळला आहे. परिणामी सोने-चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत निरंतर तेजी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत ‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार, चांदीने तब्बल २,००० रुपयांच्या किंमतवाढीसह विक्रमी ४५,००० रुपयांचा विक्रमी स्तर ओलांडला आहे.

मुंबईच्या सराफ बाजारात ‘आयबीजेए’ने प्रसिद्ध केलेल्या घाऊक किमतींनुसार, स्टॅण्डर्ड सोने (०.९९५ शुद्धता) मंगळवारच्या व्यवहाराअंती ३७,७९५ रुपये, शुद्ध सोने (०.९९९ शुद्धता) ३७,९५० रुपये तर ०.९१६ शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ३४,७६० रुपयांवर होते. या घाऊक किमती असून, किरकोळ बाजारात स्थाननिहाय किमती आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. चांदीमध्ये (०.९९९ शुद्धता) किलोमागे ४४,२८० रुपये या पातळीवर मंगळवारचे घाऊक व्यवहार संपुष्टात आले. किरकोळ बाजारात चांदीचे भाव किलोमागे ४६,००० वर गेले आहेत.

जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीने न्यूयॉर्क बाजारात प्रति औंस (२८.३५ ग्रॅमसाठी) १,५२०.३७ डॉलरचा, तर चांदीने प्रति औंस १७.३२ डॉलरचा स्तर गाठला आहे. जागतिक तेजीच्या पाश्र्वभूमीवर या मौल्यवान धातूंच्या भारतातील किमतीनेही चढता क्रम कायम ठेवला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही वाटाघाटीसाठी ते तयार नसल्याचे विधान करून आगामी महिन्यांतील चीनबरोबरच्या व्यापारविषयक चर्चेच्या निष्फळतेकडे निर्देश केला आहे. त्या परिणामी जगभरात सर्वत्र भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणात घसरण दिसून आली आणि गुंतवणूकदारांनी शाश्वत मूल्य असलेल्या सोने-चांदीकडे पैसा वळवून आश्रय मिळविल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

किमती वाढत असून स्थानिक बाजारात सोन्याची मागणी चढीच आहे. आगामी काळातील लग्न मुहूर्त आणि सणोत्सवाचा हंगाम पाहता, किमती वाढण्याच्या शक्यता गृहीत धरून लोकांकडून आगाऊ खरेदी सुरू असल्याचे सराफ बाजाराचा कानोसा घेतला असता दिसून येते.

सोने ४० हजार पार करणार!

सोन्याची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला आणि सर्वात मोठा आयातदार देश असलेल्या भारतात, तरी या मौल्यवान धातूच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहारांवरच ठरत असतात. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींनी सोमवापर्यंत वार्षिक १७ टक्क्यांनी वाढ दर्शविली आहे. प्रति औंस १,५२०.३७ डॉलर हा त्याचा सहा वर्षांतील उच्चांकी स्तर आहे. भारतात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होत असलेल्या घसरणीने, सोन्यातील तेजीला आणखीच बळ दिले आहे. ते पाहता काही दिवसांत सोन्याने तोळ्यामागे ४०,०००चा अभूतपूर्व स्तर गाठल्यास नवलाचे ठरणार नाही. मागील एका आठवडय़ात सोने १,९३० रुपयांनी वधारले आहे, तर मंगळवारच्या एका दिवसांत त्याने ६०० रुपयांनी उसळी घेतली आहे.

रुपया लवकरच ७२ पर्यंत?

औद्योगिक उत्पादन दर, महागाई दर तसेच व्यापार तूट आदींचा कल रुपयाला नजीकच्या कालावधीत डॉलरच्या तुलनेत ७२ पर्यंत घेऊन जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय अर्थघडामोडींनी स्थानिक चलन मंगळवारीच सहा महिन्यांच्या तळात पोहोचले आहे. मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत थेट ६२ पैशांनी आपटत ७१.४० पर्यंत खाली आला. रुपयाचा हा गेल्या सहा महिन्यांतील नीचांक ठरला.

अर्थव्यवस्थेबाबतची काही आकडेवारी येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे; तेव्हा रुपया ७२ पर्यंत घसरल्यास आश्चर्य वाटू नये, असे आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे चलन व वायदे वस्तू संशोधक विश्लेषक ऋषभ मारु यांनी म्हटले आहे.

First Published on August 14, 2019 3:42 am

Web Title: gold silver prices rise to record highs zws 70
Just Now!
X