फॉक्सकॉनगुंतवणूक करार खुला करण्यास सरकारचा नकार

‘फॉक्सकॉन’ या तैवानी कंपनीची ३५ हजार कोटींची गुंतवणूक आणि त्यातून ५० हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला होता, पण या कंपनीबरोबर झालेल्या सामंजस्य कराराची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना माहितीच्या अधिकारात देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे.

‘फॉक्सकॉन’ कंपनीबरोबर झालेला करारची माहिती ही त्रयस्थ पक्षाशी संबंधित आहे. सदर माहिती ही राज्याच्या आर्थिक हितसंबंधांना व वाणिज्यिक क्षेत्रातील विश्वासार्हतेला बाधा आणणारी आहे. सदर माहिती जाहीर केल्यास त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहचू शकेल व ही माहिती व्यापक हिताच्या दृष्टीने जाहीर करणे योग्य ठरणार नाही, असे उत्तर राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या स्वीय सहायकाला दिले आहे. ‘फॉक्सकॉन’ कंपनीबरोबर झालेला करार, सद्यस्थिती, प्रत्यक्ष प्रकल्प कधी सुरू होणार असे विविध प्रश्न चव्हाण यांनी माहितीच्या अधिकारात विचारले होते. पण सरकारने ही माहिती उघड करण्यास नकार दिला आहे.

‘फॉक्सकॉन’ कंपनीबरोबर झालेल्या कराराची राज्य शासनाने जाहीरातबाजी केली होती. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. आता कंपनी हा प्रकल्प राज्यात सुरू करण्यास फारशी इच्छूक नाही, असे समजते. या पाश्र्वभूमीवर माहिती देण्यास सरकारने नकार दिल्याने संशयाचे वातावरण तयार झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे.

उद्योगाला पोषक वातावरणाबाबत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राचा दहावा क्रमांक, परदेशी गुंतवणुकीत राष्ट्रीय राजधानी दिल्लीची आघाडी, गुंतवणुकीबाबत देण्यात येणारी पोकळ माहिती यावरून गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली. सरकार महिती उघड करण्यास का टाळत आहे, असा सवालही त्यांनी केला.