विधानसभेची रणधुमाळी सुरू होण्याची उलट गणती सुरू झाली असतानाच राज्यातील मराठी उद्योजकांना शिवसेना-भाजपच्या महायुतीने राज्यात सरकारी अनुदानासह १०० व्यापारी पेठ सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी २६ व्या महाराष्ट्र व्यापारी पेठेच्या उद्घाटनानिमित्ताने महायुती राज्यात सत्तेवर आल्यास हे वचन पाळले जाईल, असे सांगितले.
तावडे म्हणाले की, सध्या राज्यात विविध ठिकाणी व्यापारी पेठेची केंद्रे आहेत; पण भविष्यात जळगाव, धुळे आदी ठिकाणीही अशी केंद्र होणे गरजेचे आहे. तीन महिन्यांनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास राज्यामध्ये विविध ठिकाणी १०० व्यापारी पेठ सरकारी अनुदान प्रदान करून सुरू करण्यात येईल.
ते म्हणाले की, महाराष्ट्र ही ज्याप्रमाणे संतांची भूमी आहे तशीच महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर योद्धय़ाचीसुद्धा भूमी आहे; म्हणूनच मराठी माणसाने उद्योग क्षेत्रात योद्धय़ासारखी धडाडी मारत उद्योग क्षेत्र पादाक्रांत केले पाहिजे.
या वेळी उद्घाटनप्रसंगी व्यापारी मित्रमंडळाचे उपाध्यक्ष रमेश मेढेकर, प्रभाकर शिलधणकर, अचला जोशी आदींची भाषणे झाली. सह-कार्यवाह दीपा मंत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळ आयोजित ही महाराष्ट्र व्यापारी पेठ दादर येथील डॉ. अन्टोनिया डिसिल्व्हा शाळेच्या पटांगणात ६० दिवस सुरू राहणार आहे.