तेल, सिमेंट उत्पादनात जूनमध्ये घसरण

नवी दिल्ली : देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ यंदाच्या जूनमध्ये शून्यावर स्थिरावली आहे. तेल तसेच सिमेंट उत्पादन रोडावल्याने जून २०१९ मध्ये एकूण पायाभूत क्षेत्र ०.२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

वर्षभरापूर्वी, जून २०१८ मध्ये प्रमुख क्षेत्राची वाढ ७.८ टक्के नोंदली गेली होती. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट तसेच वीजनिर्मिती या क्षेत्राचा त्यात समावेश आहे.

जून २०१९ मध्ये खनिज तेलाचे उत्पादन ६.८ टक्क्यांनी घसरले आहे. तर शुद्धीकरण उत्पादनाची वाढ ९.३ टक्क्यांनी खुंटली आहे. तसेच सिमेंट उत्पादन १.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

खत क्षेत्रात मात्र सलग दोन महिन्यांच्या घसरणीनंतर जूनमध्ये १.५ टक्के वाढ नोंदली गेली आहे. स्टील उत्पादन व वीजनिर्मिती यंदा अनुक्रमे ६.९ टक्के व ७.३ टक्के या प्रमाणात वाढली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रमुख पायाभूत क्षेत्राची वाढही यंदा कमी झाली आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ५.५ टक्क्यांच्या तुलनेत ती यंदा ३.५ टक्के नोंदली गेली आहे.

घसरत्या पायाभूत क्षेत्रामुळे यंदा रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी द्विमासिक पतधोरण येत्या आठवडय़ात जाहीर होत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच्या सलग तीन पतधोरणात प्रत्येकी पाव टक्के दर कपात केली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील सावध प्रवास पाहता रिझव्‍‌र्ह बँक यंदाही दरकपात करेल, अशी आशा इक्रा या पतमानांकन संस्थेच्या प्रधान अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या जूनमधील एकूण औद्योगिक उत्पादन दरही १ टक्क्यावर येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.