अर्थव्यवस्थेला मरगळीतून बाहेर काढण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर कपात करेल, अशा आशा पल्लवित होऊन भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक गुरुवारी जवळपास अध्र्या टक्क्यापर्यंत उंचावले. परिणामी सेन्सेक्स ४०,३०० तर निफ्टी १२ हजारानजीक पोहोचला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७०.४२ अंश वाढीने ४०,२८६.४८ वर स्थिरावला. तर ३१.६५ अंश वाढीसह निफ्टी ११,८७२.१० पर्यंत पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्निर्देशांकाला दिवसअखेर मात्र १२ हजारापुढील स्तर गाठता आला नाही.

अर्थव्यवस्था मंदावल्याचे अधोरेखित करणारे औद्योगिक उत्पादनात उणे वाढीचे आणि महागाई निर्देशांकात भडक्याचे आकडे गेल्या दोन दिवसांत जाहीर झाले आहेत. तरीही सेन्सेक्स व निफ्टीची पुन्हा एकदा उच्चांकांकडे आगेकूच सुरू आहे. या चिंताजनक स्थितीवर उतारा म्हणून रिझव्‍‌र्ह बँक येत्या महिन्यात व्याजदर कपात करेल, याबाबत भांडवली बाजारात आशादायी सूर आहे. मुख्यत: उत्तरार्धात म्हणजे दुपारच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या खरेदीचा जोर वाढल्याचे दिसून आले.

अमेरिकी संस्था मूडीजने पतमानांकन अंदाजापाठोपाठ भारताच्या विकास दराचे भाकितही आक्रसत नेल्याचा कोणताही नकारात्मक परिणाम बाजारातील व्यवहारांवर दिसला नाही.

सेन्सेक्समध्ये वाढ नोंदविणाऱ्या समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक आदी २.६७ टक्क्यांपर्यंत भर नोंदविणारे समभाग ठरले. तर इंडसइंड बँक, वेदांता, टाटा मोटर्स, ओएनजीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या विक्री दबावामुळे तीन टक्क्यापर्यंतची घसरण झाली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, ग्राहकपयोगी वस्तू, वित्त व बँक, वाहन आदी एक टक्क्यापर्यंत वाढले. तर दूरसंचार, भांडवली वस्तू, पोलाद, ऊर्जा २.७६ टक्क्यांपर्यंत घसरले.

रुपया १३ पैसे मजबूत

डॉलरच्या तुलनेत गेल्या दोन महिन्यांच्या तळात विसावलेला रुपया गुरुवारी १३ पैशांच्या वाढीने ७१.९६ पर्यंत उंचावला. ७२ च्या खाली वाटचाल करताना स्थानिक चलनाने बुधवारी गेल्या दोन महिन्यांचा नीचांक नोंदविला होता. गुरुवारी मात्र तो सहा व्यवहारात प्रथमच उंचावला.

फेब्रुवारीपर्यंत आणखी ०.४० टक्के कपात

भारतासमोर वाढत्या महागाईचा धोका कायम असला तरी रिझव्‍‌र्ह बँक येत्या फेब्रुवारीपर्यंत आणखी ०.४० टक्के व्याजदर कपात करेल, असा बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचचा अंदाज आहे. नोव्हेंबरचा किरकोळ महागाई दर ५ टक्क्यांवर असेल, असे बँकेने म्हटले आहे. मात्र तरी रिझव्‍‌र्ह बँक डिसेंबरमध्ये ०.२५ टक्के व फेब्रुवारीच्या पतधोरणात ०.१५ टक्के रेपो दरात कपात करेल, असाही तिचा कयास आहे. ऑक्टोबरमधील किरकोळ महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या ४ टक्के अंदाजापेक्षाही पुढे गेल्याचे बुधवारीच स्पष्ट झाले. तर देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतच ५ टक्के असा गेल्या सहा वर्षांच्या तळात आहे.