निशांत सरवणकर

करोनाच्या प्रादुर्भावानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे घरांच्या किमती कमी होतील, अशा भ्रमात असलेल्या घर खरेदीदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. विकासकांचे नेतृत्त्व करणाऱ्या संघटनेनेच घरांच्या किमती कमी करण्याऐवजी विकासकांनी घर खरेदीदारांना इतर सवलती कशा देता येतील, यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज (एमसीएचआय)— कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन (क्रेडाई) या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानंतर सादर केलेल्या अहवालाद्वारे विकासकांना हा सल्ला दिला आहे. फक्त घरांच्या किमती कमी न करणे इतकेच नव्हे तर अधिकाधिक नफा कसा मिळेल, याकडे लक्ष पुरविण्याबरोबरच घर खरेदीदारांना अवाजवी सवलतीही न देण्याचे या अहवालात बजावण्यात आल्याचे कळते. हा अहवाल विकासकांच्या अंतर्गत वापरासाठी असल्याचेही सांगण्यात आले. असे सर्वेक्षण करण्यात आल्याचे एमसीएचआय—क्रेडाईचे अध्यक्ष नयन शाह यांनी मान्य केले.

अवाजवी खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी विपणनावर होणाऱ्या खर्चात कपात करावी, असेही सुचविण्यात आले आहे. जाहीररीत्या घर खरेदीदारांना सवलत देण्यापेक्षा प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी खरेदीदार आल्यानंतरच त्याला जी काही सवलत द्यायची आहे, ती देण्याबाबतही सूचना करण्यात आली आहे. दलाली देण्यापेक्षा घर खरेदीदारांना थेट घरविक्री करण्यावर भर देण्याचेही यात म्हटले आहे. दलाली देण्याऐवजी ती रक्कम घर खरेदीदाराला सवलत म्हणून द्यावी, असेही सुचविण्यात आले आहे. घरांची विक्री करण्याऐवजी अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा, ताबा कधी मिळणार याबाबत घर खरेदीदारांना खरीखुरी तारिख सांगणे, सांगितलेल्या किमतीत बदल न करणे, पैसे भरण्याबाबत सुलभ हप्ते आदी मार्गाने घर खरेदीदारांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

सर्वेक्षणात ५०० विकासकांचा समावेश होता. पैकी ६० टक्के विकासकांनी बांधकाम उद्योगाची गाडी रुळावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल असे म्हटले आहे .

घरांच्या किमती कमी करण्यापेक्षा खरेदीदारांना पारदर्शकता हवी आहे. विकासक आशावादी असून नवे गृहप्रकल्प जारी करण्याचीही तयारी करीत आहेत. घरातून काम करण्याच्या पद्धतीला महत्त्व येणार आहे. ही पद्धत अवलंबिण्यास सुरुवात केली आहे.

— नयन शाह, अध्यक्ष, एमसीएचआय—क्रेडाई