सरत्या संवस्तराला शेअर बाजाराने तेजीसह निरोप दिला. तेजीची तयारीच जणू गेल्या चार सत्रांपासून सुरू होती. शुक्रवारच्या लक्ष्मीपूजनानंतर शेअर बाजाराचे नवे वर्ष सुरू झाले आहे. संवत्सर २०७१ या नवीन वर्षांकडे निधी व्यवस्थापक कसे पाहतात? कोणत्या उद्योग क्षेत्राकडे निधी व्यवस्थापक सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे जाणून घेण्यासाठी आम्ही आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व समभाग गुंतवणुकीचे प्रमुख मनीष कुमार यांच्याशी बातचीत केली :
नव्या संवस्तसराकडून गुंतवणूकदारांच्या उंचावणाऱ्या अपेक्षा आहेत. निधी व्यवस्थापक म्हणून नवीन वर्षांकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता?
सोळाव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत मिळून सरकार सत्तेवर आले आहे. मुखत्वे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या व इतर जिनसांच्या किमती स्वप्नवत वाटाव्या इतक्या खाली आल्या आहेत. साहजिकच इंधनाच्या अनुदानात कमालीची घट झाली आहे. डिझेलच्या किमती पाच वर्षांत प्रथमच कमी झाल्या आहेत. सरकारने डिझेल नियंत्रणमुक्त केले आहे. या सर्व गोष्टींमुळे महागाई कमी होऊन व्याजदर कपातीला सुरुवात होण्याची आशा आहे. व्याजदर कपातीचा फायदा कंपन्यांना होऊन त्यांची नफा क्षमता वाढेल. यामुळे शेअर बाजाराला फायदा होईल.
यावर्षी तुम्ही कुठल्या उद्योग क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने पाहता?
अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेता आम्हाला भांडवली वस्तू, खासगी बँका, दूरसंचार, वाहन उद्योग, वाहन पूरक उद्योग या उद्योग क्षेत्रांबाबत आमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे.
सध्या अनेक समभागांमध्ये तेजीतील मूल्य प्रतिबिंबित होत आहे. गुंतवणुकीसाठी समभागांची निवड करण्यासाठी तुम्ही काय निकष लावता?
विमा क्षेत्रात येणारा निधी हा दीर्घकाळ आमच्याकडे राहणारा असल्याने आम्ही आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्समध्ये दीर्घकालीन नफा क्षमता असलेल्या कंपन्यांना प्राधान्य देतो. आम्ही गुंतवणुकीसाठी आमची स्वत:ची पद्धत विकसित केली आहे. ज्यामध्ये जोखीम नियंत्रणाचे कडक निकष आहेत. आम्ही संख्यात्मक व गुणात्मक विश्लेषण व कंपनी उद्योग क्षेत्र यांचे संशोधन करतो. याव्यतिरिक्त कंपनी व्यवस्थापनास भेटणे इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणूक ही कडक परीक्षा असते व हे कडक निकष लावून त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या कंपन्यांचाच आमच्या गुंतवणुकीत समावेश होतो.  
कंपन्यांच्या सहामाही निकालास प्रारंभ झाला आहे. तुम्ही या निकालांकडे कसे पाहता?
आमचा असा कयास आहे की, सध्या सुरू असलेल्या तिमाही निकालांचा कल आशावादी असेल. अनेक कंपन्यांच्या नफ्यात दोन आकडी वृद्धी झाली असेल. मागील काही दिवसांमध्ये नफ्यात उत्तम वाढ दर्शविलेल्या माहिती तंत्रज्ञान औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या नफा वाढीचा वेग मंदावला असण्याची शक्यता आहे. दूरसंचार, वाहन उद्योग व वाहन पूरक उत्पादने व्यवसायातील कंपन्या आमच्या गुंतवणुकीत महत्त्वाची भूमिका वठवतील.  
तुमच्या कंपनीच्या यूलिपच्या कामगिरीबद्दल काय सांगाल?
आमच्या एकूण मालमत्तेपकी अंदाजे ९६ टक्के मालमत्ता यूलिप फंडांची आहे (समभाग, रोखे व बॅलंस्ड फंड मिळून) या सर्वच यूलिप फंडांनी आपापल्या तुलनेसाठी निवडलेल्या निर्देशांकापेक्षा अव्वल कामगिरी केली आहे. पुढील निदान पाच वष्रे आमचे फंड निर्देशांकांपेक्षा अव्वल कामगिरी करतील.