वादग्रस्त व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी नातेसंबंध आणि हितसंबंध जपत मेहेरनजर केल्याच्या आरोपात खुद्द् बँकेच्या प्रमुख चंदा कोचर गुंतल्या असताना, खासगी क्षेत्रातील अग्रणी आयसीआयसीआय  बँकेतील ‘निगम प्रशासन’ आणि कारभार क्षमतेबाबत आता जागतिक आघाडीची पतमानांकन संस्था ‘फिच’ने सवाल उपस्थित केले आहेत.

संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला बुडीत कर्ज समस्येने ग्रासलेले असताना, कर्ज घोटाळ्याची प्रकरणे ताजी असताना, उठलेले हे आरोपांचे मोहोळ या खासगी बँकेच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविणारे आहे, अशा शब्दात फिचने टिप्पणी केली आहे. व्हिडीओकॉनला दिलेले कर्ज प्रकरण पटलावर आले असताना, गेल्या महिन्यात आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांची पूर्ण पाठराखण करीत असल्याचे जाहीर केले. या प्रकरणी त्यांनी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा खुलासा संचालक मंडळाने केला. तथापि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ने याप्रकरणी प्रारंभिक तपास सुरू केला असून, सक्तवसुली संचालनालयानेही तपास सुरू केला आहे. दरम्यान चंदा कोचर यांच्या दिराची सलग चार दिवस सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे.

आयसीआयसीआय बँकेसारख्या  खासगी बँकेच्या कर्ज प्रकरणावर हितसंबंधी मेहेरनजर झाल्याचे आरोप होणे हे चिंताजनक आहे. आधुनिक खासगी बँकांचा कारभार आणि प्रशासन हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा सरस आणि गुणात्मक असते, या धारणेला तडा जाईल आणि बँकेच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण करणारा हा घटनाक्रम आहे, अशी फिचची टिप्पणी आहे.

सर्व घडामोडींवर आपली बारकाईने देखरेख असून, यातून बँकेच्या प्रतिष्ठा आणि पर्यायाने वित्तीय स्थितीवर काही विपरीत परिणाम दिसण्याची शक्यता दिसल्यास योग्य ती कृती केली जाईल, असे फिचने स्पष्ट केले आहे. गुंतवणूकदारांना सजग करून दक्षता बाळगण्याचा हा इशाराच मानला जात आहे. व्हिडीओकॉन कर्जाचे प्रकरण प्रकाशात आल्यापासून आयसीआयसीआय बँकेच्या समभागाची कामगिरीही कमालीची ढासळली आहे. सोमवारच्या व्यवहारातही प्रमुख निर्देशांक तेजीत असताना, हा समभाग बीएसईवर ०.०५ टक्क्य़ांच्या घसरणीसह २८०.४५ पातळीवर स्थिरावलेला दिसला.

तुलनेने चांगले वेतनमान मिळविणाऱ्या, उच्च पात्रतेच्या व्यक्ती नेतृत्वस्थानी असलेल्या आणि व्यापक गुंतवणूकदार पाया असणाऱ्या खासगी बँकांचा कारभार आणि प्रशासन हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा सरस आणि गुणात्मक असते, या धारणेला तडा जाईल आणि या बँकांच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण करणारा हा घटनाक्रम आहे..

– ‘फिचच्या अहवालातील टिप्पणी