निश्चलनीकरणानंतर फंड गुंतवणुकीत वाढता ओघ; समभाग संलग्न पर्याय पसंतीचा

गेल्या महिन्यात विविध फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी ५१,००० कोटी रुपये गुंतविले आहेत. आधीच्या महिन्यापेक्षा ही रक्कम कितीतरी अधिक आहे.

म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांची संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये विविध प्रकारच्या फंड प्रकारांमध्ये ५१,१४८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतविली आहे. गुंतवणूकदारांनी त्यापूर्वी १६,६०४ कोटी रुपये गुंतविले होते.

यामुळे चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यातील गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंड ओघ २.५० लाख कोटी रुपयांहून अधिक राहिला आहे. वर्षभरापूर्वीच्या नोटाबंदीचा फंड गुंतवणूक वाढण्यास अधिक लाभ झाल्याचे निरिक्षण बजाज कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पारिख यांनी नोंदविले आहे. बँकांमधील घसरते ठेवी व्याजदर यामुळे गुंतवणूकदारांनी या पर्यायाला पसंती दिल्याचे ते म्हणाले.

समभाग संलग्न तसेच समभाग संलग्न बचत योजना, इन्कम फंडसारख्या फंड पर्यायात गुंतवणुकीचा ओघ यंदा वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. समभाग व समभाग संलग्न गुंतवणूक योजनांमध्ये गेल्या महिन्यात १६,००० कोटी रुपये आले आहेत. तर इन्कम फंड प्रकारात ४०,८४५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तुलनेत गोल्ड इटीएफमध्ये ३४ कोटी रुपयांचा निधीऱ्हास अनुभवला गेला आहे.

देशातील विविध ४२ फंड घराण्यांमार्फत २१.४१ लाख कोटी रुपयांचा निधीचे व्यवस्थापन गेल्या महिन्यात पाहिले गेले आहे. सप्टेंबरअखेरच्या २०.४० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम अधिक व आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

निश्चलनीकरणानंतर आतापर्यंत फंडांमध्ये १.३५ लाख कोटी रुपये आल्याचे मॉर्निगस्टारचे सल्लागार कौस्तुभ बेलापूरकर यांनी म्हटले आहे.

मुंबई, दिल्लीसारख्या महानगरां व्यतिरिक्त अन्य शहरांमध्ये फंड गुंतवणुकीबाबत प्रसार करण्याचे नियामक यंत्रणा सेबीने केलेल्या आवाहनानंतर या भागातून निधी वाढण्याचा कलही गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आला आहे. फंड कंपन्याही या भागात अधिक प्रसार करताना दिसत आहेत.