घसरत्या निर्मिती क्षेत्राचा विकास दराला फटका

नवी दिल्ली/ मुंबई  : रोडावलेल्या निर्मिती क्षेत्रामुळे देशाचा विकासदर ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीत गेल्या सात वर्षांत सर्वात कमी- ४.७  नोंदवण्यात आला. दुसरीकडे करोना विषाणूची साथ अनेक देशांमध्ये पसरल्याने जागतिक भांडवली बाजाराला तडाखा बसला. परिणामी, गुंतवणूकदारांचे ५.४६ लाख कोटी डॉलर्स बुडाले. त्याचा फटका भारतीय भांडवली बाजारालाही बसला आणि मुंबई भांडवली बाजार निर्देशांक शुक्रवारी १,४५० अंशांनी कोसळला.

रोडावलेल्या निर्मिती क्षेत्रामुळे देशाचा विकास दर गेल्या सात वर्षांत कमी नोंदवला गेला. डिसेंबर २०१९ अखेरच्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन ४.७ टक्के नोंदले गेले.

यापूर्वीचा ४.३ टक्के असा किमान विकासदर जानेवारी ते मार्च २०१३ दरम्यान होता. तर आधीच्या तिमाहीत, जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान तो ४.५ टक्के होता. वर्षभरापूर्वी, याच दरम्यान, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ मध्ये तो ५.६ टक्के होता.राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गेल्या तिमाहीचे सकल राष्ट्रीय उत्पादन प्रमाण जाहीर करताना चालू वित्त वर्षांतील यापूर्वीच्या दोन तिमाहीतील सुधारित विकास दर स्पष्ट केला आहे. त्यानुसार, एप्रिल ते जून २०१९ दरम्यान तो ५ टक्क्यांऐवजी ५.६ टक्के तर जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान तो ४.५ टक्क्यांऐवजी ५.१ टक्के आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

चालू संपूर्ण वर्षांसाठी ५ टक्के विकासदराचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा हा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजसमकक्षच आहे.

करोनाच्या जागतिक भयाने सेन्सेक्सची आपटी

मुंबई : हजारोंचे बळी घेणारे ‘करोना’ संकट जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर येऊन ठेपण्याच्या धास्तीने आपटणाऱ्या परदेशी भांडवली बाजारांच्या पावलावर पाऊल टाकत सेन्सेक्स आणि निफ्टीने सप्ताहअखेर ‘काळा शुक्रवार’ अनुभवला. आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहाराची सुरुवात हजाराहून अधिक अंशांच्या घसरणीने करताना मुंबई निर्देशांकाने अखेर १,४५० अंशांचे नुकसान सोसले. एकाच सत्रात ३९ हजारांचा स्तर सोडणाऱ्या बाजारात गुंतवणूकदारांचे ५.४६ लाख कोटी रुपये बुडाले.

गुरुवारी झालेल्या महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या सत्राच्या तुलनेत नव्या महिन्यातील वायदाप्रारंभाला सेन्सेक्स १,४४८.३७ अंशांनी आपटून ३८.२९७.२९ पर्यंत खाली आला. तर ४३१.५५ अंश घसरणीने निफ्टी ११,२०१.७५ वर स्थिरावला. सलग सहा व्यवहारांत घसरण नोंदविणाऱ्या मुंबई भांडवली बाजाराच्या सेन्सेक्सचा चालू सप्ताहाचा कमकुवत प्रवासही ‘सब प्राइम’च्या कालावधीनंतरचा, २००८ नंतरचा सुमार ठरला. तर सत्रातील सेन्सेक्सची अंश आपटी इतिहासातील दुसरी मोठी ठरली.