23 November 2017

News Flash

म्युच्युअल फंड गंगाजळी २० लाख कोटींवर

समभाग संलग्न फंडात ऑगस्टमधील ओघ विक्रमी २० हजार कोटींवर

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 8, 2017 2:18 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

समभाग संलग्न फंडात ऑगस्टमधील ओघ विक्रमी २० हजार कोटींवर

वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली बाजाराचा प्रवास फंड मालमत्तेच्या पथ्यावर पडला आहे. समभागनिगडित फंडातील गुंतवणूक वाढल्याने एकूण म्युच्युअल फंड गंगाजळीने ऑगस्टमध्ये २० लाख कोटी रुपयांचा अनोखा टप्पा पार केला आहे.

गेल्या महिन्यात मासिक तुलनेत फंड गुंतवणुकीत २.३ टक्के वाढ झाली असली तरी समभाग निगडित फंड योजनांमधील निधी ओघ मात्र तब्बल ६० टक्क्यांनी वाढला आहे. या फंड प्रकारात यंदा २०,३६२ कोटी रुपये आले आहेत. समभाग संलग्न फंडातील गुंतवणूकही विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे.

ऑगस्टमधील २ तारखेला सेन्सेक्स ३२,६८६.४८ अंश हे विक्रमी शिखर गाठणारा निर्देशांक ठरला होता. मुंबई निर्देशांक आतापर्यंत ३.१३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ठेवींवरील व्याज कमी होत असताना गुंतवणूकदारांचा ओढा पुन्हा एकदा भांडवली बाजार व म्युच्युअल फंड पर्यायाकडे वळला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या ‘असोसिएशन्स ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया’(अ‍ॅम्फी)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्ता २०.६ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारापैकी बॅलेन्स्ड फंडातील गुंतवणूक ऑगस्टमध्ये ११.७ टक्क्यांनी वाढून ८,७८३ कोटी रुपयांवर गेली आहे. डेट आणि इक्विटीचा समतोल राखणाऱ्या या फंड प्रकारातील गुंतवणुकीचाही यंदा विक्रम नोंदला गेला आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाची वाढ ही २०१४ पासून आजतागायत सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत फंड गंगाजळी दुप्पट झाली आहे. या कालावधीत ही रक्कम १०.१ लाख कोटी रुपयांवरून ती २०.६ लाख कोटी रुपये झाली आहे. किरकोळ तसेच उच्च मालमत्ता गुंतवणूकदारांचा विशेषत: गेल्या वर्षांत समभाग संलग्न तसेच बॅलेन्स फंडातील निधी ओघ वाढला आहे. एकूण म्युच्युअल फंड मालमत्तेत व्यक्तिगत गुंतवणूकदारांचा हिस्सा ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. छोटय़ा शहरातील गुंतवणूकदारांचे प्रमाण १८ टक्क्यांहून अधिक आहे. ‘एसआयपी’च्या माध्यमातूनही फंडांमध्ये महिन्याला ५,००० कोटी रुपये येत आहेत.

एकूण म्युच्युअल फंड उद्योगाच्या मालमत्तेत व्यक्तिगत गुंतवणूकदारांचा हिस्सा ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. छोटय़ा शहरातील गुंतवणूकदारांचे प्रमाण १८ टक्क्यांहून अधिक आहे. त्याचप्रमाणे एसआयपीसारख्या माध्यमातूनही फंडांमध्ये महिन्याला ५,००० कोटी रुपये येत आहेत. परिणामी गेल्या दोन वर्षांत फंड गंगाजळी दुपटीने वाढली आहे.  – कौस्तुभ बेलापूरकर, संचालक – व्यवस्थापक, संशोधन, मॉर्निगस्टार इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर इंडिया

 

First Published on September 8, 2017 2:18 am

Web Title: indian mutual funds now manage record rs 20 lakh crore