डॉलरच्या तुलनेत रुपयातील आपटी मंगळवारीही कायम राहिली. सलग दुसऱ्या सत्रात घट नोंदविताना रुपया ९० पैशांनी घसरला. त्यामुळे स्थानिक चलन दिवसअखेर ५८.७७ असे ५९ च्या नजीक जाऊन विसावले. भारतीय चलनात सोमवारीही ३६ पैशांची घसरण नोंदली गेली होती. तत्पूर्वी अध्र्या रुपयाच्या वाढीने रुपया गेल्या सप्ताहअखेर ५८ च्या वर होता.
सोने २८ हजारावर
भांडवली बाजारातील घसरण सराफा बाजारात पुन्हा तेजी नोंदविण्यास भाग पडू लागली आहे. शहरात सोन्याचा दर मंगळवारी तोळ्यामागे २८ हजार रुपयांच्या पार गेला. १० ग्रॅमसाठी स्टॅण्डर्ड सोन्याचा दर १८५ रुपयांनी उंचावत २८,०२५ रुपयांपर्यंत गेला. तर शुद्ध सोन्याचा भाव याच वजनासाठी २८ हजाराच्या पुढे राहत २८,१७० रुपयांपर्यंत गेला. मुंबईत पांढऱ्या धातूचे, चांदीचे दरही किलोमागे २१० रुपयांनी वधारत ४५ हजार रुपयांच्या पुढे गेलेले मंगळवारी पाहायला मिळाले.