रुपयाच्या घसरणीची मात्रा तीव्र होत तिने बुधवारी सकाळीच ६८ ची वेस गाठली आणि दिवसअखेर प्रति डॉलर ६८.८० हा नवा ऐतिहासिक नीचांक गाठला. अन्नसुरक्षा कायद्याने सरकारच्या तिजोरीवरील अनुदान-भारातील वाढ आणि अमेरिकेकडून आखातातील तेल-उत्पादक सीरियावरील संभाव्य हल्ल्याचा ताण चलन-बाजारातील व्यवहारांवर स्पष्टपणे दिसून आला आणि रुपयाच्या घसरणीचा क्रम आणखीच बळावलेला दिसला.
बुधवारी सकाळीच रुपयातील घसरण कमालीची विस्तारलेली पाहून भांडवली बाजारात शेअर निर्देशांकांनी ५०० अंशांची दाखविलेली घसरण पाहता, एकूण घबराटीला आणखीच खतपाणी घातले. एरवी महिनाअखेर असल्याने आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढतेच, त्यातच भांडवली बाजारातून माघारी परतत असलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून डॉलरच्या मागणीची भर पडली. परिणामी एकाच दिवसांत डॉलरमागे तब्बल २५८ पैशांची (३.१३%) घसरणीची परिसीमा रुपयाने गाठली. मंगळवारच्या ऐतिहासिक ६६.२४ पातळीवरून ही घसरण दिवसअखेर ६८.८२ वर पोहचली.
रुपयाने चालू आठवडय़ातच सलग घसरता क्रम कायम ठेवत डॉलरमागे तब्बल ८ टक्क्यांनी मूल्य गमावले आहे, तर चालू आर्थिक वर्षांच्या प्रारंभापासून १९ टक्क्यांनी अवनती दाखविली आहे. ढासळत्या रुपयाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच धोक्यात आणणारा परिणाम विदेशी गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल आणखी वाढवणारा ठरला आहे. देशातील रोखे व भांडवली बाजारातून गेल्या सप्ताहाभरात (कालच्या मंगळवापर्यंत) १ अब्ज डॉलर्सची निर्गुतवणूक विदेशी वित्तसंस्थांनी केली आहे.
चलन वायदा व्यवहारांवर बंदीचा विचार नाही : अर्थमंत्रालय
रुपयातील तीव्र घसरण हे अनाठायी भीती आणि ‘अतक्र्य बाजारभावने’लाच प्रतिबिंबित करीत आहे, असा अर्थमंत्रालयाच्या वतीने बुधवारी पुनरुच्चार करण्यात आला. काल अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही संसदेत भाषण करताना, रुपयाच्या घसरणीला घबराटीचे वातावरणच जबाबदार असल्याचे नमूद करून रुपयाला सावरण्यासाठी १० कलमी कार्यक्रम घोषित केला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयातील सचिव अरविंद मायाराम यांनीही संयतपणे व धीराने वाटचाल करणे आजच्या घडीला महत्त्वाचे असून, नाहक भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगितले. चालू खात्यातील तूट ही २०१३-१४ अखेर पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप खाली राहील. मागील ८८.२ अब्ज डॉलरवरून ही तूट ७० अब्ज डॉलरच्या खाली येणे सरकारला अपेक्षित आहे. तथापि चलन बाजारातील वायदा व्यवहारांवर बंदी आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.