15 December 2019

News Flash

बाजार निर्देशांकांची दौड सुरूच!

मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा सत्राचा प्रवासच तेजीसह झाला.

दक्षिण भारतात मान्सून धडकल्याचे भांडवली बाजाराने बुधवारच्या व्यवहाराच्या सुरुवातीला केलेले स्वागत दिवसअखेपर्यंत राहू शकले. सत्रात २७ हजारावर प्रवास करताना मुंबई निर्देशांकाने गेल्या सात महिन्यांचा वरचा टप्पा गाठला; प्रमुख निर्देशांकांचा व्यवहाराचा शेवट मात्र किरकोळ वाढीसह झाला. १०.९९ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,०२०.६६ वर तर ६.६० अंश भर पडत राष्ट्रीय सेअर बाजाराचा निफ्टी ८,२७३.०५ पर्यंत गेला.

पूरेशा पावसानंतर व्याजदर कपात करता येईल, या रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांच्या आश्वासनाची जोड केरळात बुधवारी दाखल झालेल्या पावसाच्या रुपात बाजाराला मिळाली. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा सत्राचा प्रवासच तेजीसह झाला.
डॉलरच्या तुलनेत वाढणारा रुपया, आगामी दूरसंचार लहरी लिलावाकरिता वापर शुल्कनिश्चिती या जोरावर प्रमुख निर्देशांकांची सत्रात चढती कमान राहिली. यामुळे बाजारात पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ दिसून आला.
देशाच्या संरक्षण क्षेत्रातील नवे कंत्राट मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील वालचंदनगर, रिलायन्स डिफेन्स, बीईएमएल, भारत ईलेक्ट्रॉनिक्ससारख्या समभागांकरिता मागणी नोंदविली. तर दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही वाढले.
२७,०८५.२४ ने सुरुवात करणारा सेन्सेक्स सत्रात २७,१०५.४१ पर्यंत वाढला. दिवसअखेर त्याचा बंद झालेला २७ हजारापुढील स्तर हा २८ ऑक्टोबर २०१५ नंतरचा सर्वात वरचा राहिला. तर निफ्टीने बुधवारी ८,२७५ नजीकचा स्तर गाठला.
मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप अनुक्रमे ०.८९ व ०.५२ टक्क्य़ाने वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा वगळता इतर सर्व वाहन, भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता, ग्राहकपयोगी वस्तू, तेल व वायू, पोलाद, बँक क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली.
सेन्सेक्समधील ३० पैकी निम्मे समभाग तेजीच्या तर निम्मे घसरणीच्या यादीत राहिले. वधारलेल्या समभागांमध्ये भेल, एल अ‍ॅन्ड टी, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, विप्रो, टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, एचडीएफसी लिमिटेड, मारुती सुझुकी, स्टेट बँक यांचा क्रम राहिला. स्थानिक बाजाराला आशियाई तसेच युरोपीय बाजारांनीही साथ दिली. तेथील प्रमुख निर्देशांकही एक टक्क्य़ापर्यंत वाढले होते.

First Published on June 9, 2016 7:21 am

Web Title: indian share market
टॅग Bse,Nse,Share Market
Just Now!
X