सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

पुढील सप्ताहात दिवाळीनंतर बाजाराच्या कलाबद्दल उत्सुकता आहे. स्टेट बँकेच्या सुधारलेल्या कामगिरीचे प्रतिबिंब बाजाराच्या वाटचालीवर नक्कीच पडेल..

मागच्या सप्ताहात पाचही दिवस वर जाणारा बाजार पहिल्याच दिवशी अडखळला. तो इन्फोसिससारख्या नामवंत कंपनीच्या ताळेबंदावरील संशयाच्या बातमीमुळे. नंतरच्या दिवसांत अनेक कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाही निकालांचा मागोवा घेत बाजार दोलायमान राहिला, पण सेन्सेक्सचा ३९,०००चा टप्पा टिकवत सप्ताहाची अखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांकाच्या (सेन्सेक्स) २४० अंशाच्या तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकाच्या (निफ्टी) ७८ अंशाच्या किरकोळ साप्ताहिक घसरणीने झाली.

सध्या सुशासनामुळे चर्चे च्रेत असणाऱ्या इन्फोसिसचा दिवाळी खरेदी म्हणून विचार करता येईल. व्यवसाय वाढविण्यासाठी कंपनी शक्य तेव्हा परदेशात मालमत्ता संपादन करीत आहे, नवीन ग्राहक जोडत आहे. कंपनीची आर्थिक आकडेवारीसुद्धा चांगली आहे. हे गुंतवणूकदारांना कंपनी पुरेसा लाभांश देत असून आजपर्यंत कंपनीने बक्कळ बोनसचे माप गुंतवणूकदारांच्या पदरात घातले आहे. दीर्घ कालावधीसाठी या समभागातील गुंतवणूक चांगला फायद्याची ठरू शकेल.

दुसऱ्या तिमाहीत एसीसीबरोबर अल्ट्राटेक आणि श्री सिमेंट या आघाडीच्या सिमेंट उत्पादकांनीही गेल्या वर्षांच्या तुलनेत नफ्यामध्ये घसघशीत वाढ जाहीर केली आहे. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे आगामी सहा महिन्यांत सिमेंट उद्योगांच्या समभागातील गुंतवणूक लाभदायी ठरेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील तीन वर्षांसाठी ठरविलेले तीन लाख कोटींच्या प्रकल्पांचे उद्दिष्ट सिमेंटच्या मागणीला पूरक ठरेल.

तिमाही निकालांमध्ये सातत्याने २० टक्क्यांहून जास्त वाढीची कामगिरी करणाऱ्या एचडीएफसी बँकेने कॉर्पोरेट व रिटेल कर्जाचा समन्वय साधत दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात २७ टक्के वाढ जाहीर करून आव्हानात्मक काळातही नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली आहे. या सप्ताहात जाहीर झालेल्या अ‍ॅक्सिस, कोटक तसेच बजाज समूहातील वित्तीय कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचे निकालही आकर्षक होते. वाहन उद्योगाला मंदीचा सर्वात जास्त फटका बसल्यामुळे मारुती सुझुकी, बजाज ऑटो व हिरो मोटर्सच्या विक्रीमध्ये दुसऱ्या तिमाहीत घसरण झाली. कंपनी करामधील बचतीमुळे बजाज ऑटो नफा जाहीर करू शकली.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने मंदीच्या काळातही उत्पन्नात १५ तर नफ्यात १३ टक्के वाढ जाहीर करून सुखद धक्का दिला आहे. उद्याच्या दिवाळी मुहूर्त खरेदीसाठी लार्सन आणि टुब्रो, टाटा स्टील आणि जरा जास्त जोखीम घेणाऱ्यांसाठी येस बँकेचे समभाग आकर्षक वाटतात.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड पीव्हीसी पाइप आणि फिटिंग्जचा भारतातील एक प्रमुख उत्पादक आहे. कंपनीची पीव्हीसी पाइप आणि फिटिंग्जचा स्थापित क्षमता ३.७ लाख मेट्रिक टन, तर पीव्हीसी रेझिनची स्थापित क्षमता २.७२ मेट्रिक टन आहे. कंपनीचा ४३ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. कंपनीने पाइप आणि फिटिंग्जचा विस्तार कार्यक्रम पूर्ण केला असून बहुतांश पीव्हीसी रेझिन कंपनीच्या पाइप आणि फिटिंग्जच्या उत्पादनासाठी वापरले जाईल. या बदलामुळे मूल्यवर्धन होणार असल्याने कंपनीची नफाक्षमता वाढेल. पुढील दिवाळीपर्यंत १५ ते २० टक्के नफा होण्याची शक्यता असल्याने या कंपनीचा १८ ते २४ महिन्यांसाठी विचार करावा.

आतापर्यंतच्या तिमाही निकालांवर नजर टाकली तर बऱ्याच कंपन्यांच्या विक्रीमध्ये मामुली वाढ, किंबहुना घट झालेली दिसते. परंतु खर्चावरील नियंत्रण व करांमधील सवलतीचा फायदा घेऊन नफ्यामध्ये वाढ करण्यात काही कंपन्या यशस्वी झाल्या आहेत. वाहन व पायाभूत उद्योगांना मंदीची झळ जास्त बसली आहे. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी जाहीर झालेल्या निकालात सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुलै ते सप्टेंबर तिमाही नफ्यात घसघशीत वाढ झाली. मागील वर्षी या कालावधीतील नफा ९४४ कोटी रुपयांवरून या वर्षी ३,०११ कोटी रुपये झाला.