ऐन सणांच्या तोंडावर देशातील औद्योगिक उत्पादनाची स्थिती चांगली नसल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या ऑगस्टमधील आकडेवारीने दाखवून दिले. जुलैमध्ये भरघोस औद्योगिक उत्पादन वाढ राखल्यानंतर त्या पुढील महिन्यात मात्र ती ०.६ टक्के अशी निराशाजनक राहिली आहे.
देशातील औद्योगिक उत्पादनाने जुलै २०१३ मध्ये २.८% वाढ नोंदविली होती. तर वर्षभरापूर्वी ऑगस्ट २०१२ मध्ये ती २% होती. यंदाच्या याच कालावधीत मात्र विद्युत उपकरणे आदी ग्राहकोपयोगी व गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन २%हूनही कमी राहिले आहे.
आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या दसऱ्यापासून यंदाच्या सणांचा मोसम सुरू होत असताना गृहोपयोगी वस्तूंच्या निर्मितीची स्थिती चिंताजनक बनली आहे. या कालावधीत ग्राहकांकडून अशा उत्पादनांना वाढती मागणी नोंदविली जाते. जूनमध्ये एकूण औद्योगिक उत्पादन उणे १.८% असे नकारात्मक नोंदविले गेल्यानंतर, जुलैमध्ये ते थेट २.८%पर्यंत उंचावले होते. आता पुन्हा ऑगस्टमध्ये ते जेमतेम अध्र्या टक्क्यानजीक खालावले आहे.
निर्मिती क्षेत्राची वाढ ऑगस्टप्रमाणेच एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांतही ०.१ टक्के अशी नकारात्मक राहिली आहे. तर खनिकर्म वाढही ऑगस्टमध्ये ०.२ टक्केच आहे.