देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीनं १ जानेवारीपासून आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं बुधवारी याबबात माहिती दिली. गाड्यांच्या भागांच्या वाढलेल्या किंमतींमुळे कंपनीवर होत असलेला परिणाम कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. गेल्या वर्षी विविध प्रकारच्या उत्पादनखर्चामुळे कंपनीच्या वाहनांच्या किंमतीवर विपरीत परिणाम झाला आहे, असं शेअर बाजाराला देण्यात आलेल्या माहितीत कंपनीनं म्हटलं आहे. त्यामुळे याचा थोडा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळेच गाड्यांच्या किंमतीत १ जानेवारीपासून वाढ करण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. अनेक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसला होता. वाहन उत्पादन, विक्री क्षेत्रही त्यापैकी एक होतं. देशात लॉकडाउन हटवण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झाल्यानंतर वाहन क्षेत्रावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला होता. परंतु अशा परिस्थितीत मारूती सुझुकीनं आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारूतीच्या एंट्री लेव्हलच्या गाड्यांची किंमत ही २.९५ लाखांपासून सुरू होते तर मल्टीपर्पझ कार एक्सएल ६ या गाडीची किंमत ११.५२ लाखांपासून सुरू होते.

देशांतर्गत विक्रीत घट

नोव्हेंबर महिन्यात देशात प्रवासी वाहनांच्या विक्रीत २.४ टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळाली. या महिन्यात देशात एकूण १ लाख ३५ हजार ७७५ गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत १ लाख ३९ हजार १३३ गाड्यांची विक्री झाली होती. परंतु निर्यातीचा विचार केल्या कंपनीती एकूण विक्री गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत १.७ टक्के अधिक होती.

सुलभरित्या कर्ज

मारूती सुझुकी इंडियानं आपल्या नव्या कार्सच्या ऑनलाइन फायनॅन्ससाठी ‘स्मार्ट फायनॅन्स’ ही सुविधा लाँच केली आहे. नेक्सा रिटेल चेनद्वारे ३० शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं दिली. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत आपल्या दुसऱ्या रिटेल चेनद्वारे ही सुविधा अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या सुविधेसाठी कंपनीनं एचडीएफसी बँक, येस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, चोलामंडलम फायनॅन्स, एयू स्मॉल फायनॅन्स बँक, महिंद्रा फायनॅन्स, कोटक महिंद्रा प्राईम यांची निवड केली आहे. सध्या ही सुविधा केवळ वेतनधारकांसाठीच असणार आहे. त्यानंतर पुढील कालावधीत या सुविधेची व्याप्ती वाढवली जाईल.