देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने २०१४ ची सुरुवात चांगली राहिली, असे मानण्यास पुष्ठी देणारे सबळ आकडे बुधवारी सायंकाळी जाहीर झाले. सलग तीन महिने घसरणीनंतर देशाचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत  सकारात्मक म्हणजे ०.१ टक्क्यांनी वधारले, तर फेब्रुवारीतील किरकोळ महागाईचा दर ८.१ टक्क्यांवर म्हणजे दोन वर्षांच्या नीचांक स्तरावर पोहोचला. एकूण अन्नधान्याचा दरही या कालावधीत कमी झाल्याने रिझव्‍‌र्ह बँकेला येत्या पतधोरणात व्याजदर कपातीसाठी हे पूरक खाद्य ठरावे.
गेल्या वर्षी जानेवारी २०१३ मध्ये औद्योगिक उत्पादन २.५ टक्के वधारले होते. तर ऑक्टोबर ते डिसेंबर २०१३ या दरम्यान ते सातत्याने उणे राहिले. ऊर्जानिर्मिती, खनिकर्म वाढ यांच्या जोरावर यंदाच्या जानेवारीत मात्र औद्योगिक उत्पादन ०.१ टक्क्यांपर्यंत वाढण्यास साहाय्य ठरले आहे.
औद्योगिक उत्पादनात सर्वाधिक ७५ टक्क्यांपर्यंत हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राला मात्र ०.७ टक्के घसरणीला सामोरे जावे लागले आहे. २०१३-१४ मधील एप्रिल ते जानेवारीदरम्यान देशाचे औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत स्थिर असे एक टक्क्याने वाढले आहे.  रिझव्‍‌र्ह बँकेसाठी चिंतेचा असणारा अन्नधान्य महागाई दर जानेवारीत ९.९ टक्के होता. गेल्या महिन्यात तो ८.५ टक्क्यांवर आला आहे. याचबरोबर भाज्यांच्या किमती जानेवारीतील २१.९१ टक्क्यांवरून फेब्रुवारीत १४.०४ टक्क्यांपर्यंत स्थिरावल्या आहेत. फेब्रुवारीत ८.१ टक्के नोंदले गेलेला किरकोळ महागाई दर हा गेल्या २५ महिन्यातील नीचांक आहे. यापूर्वी जानेवारी २०१२ मध्ये त्याने ७.६५ टक्के दर राखला होता. तर यंदाच्या जानेवारीत हा दर ८.७९ टक्के होता. एकूण किरकोळ महागाई दर सलग तीन महिने घसरता राहिला आहे.